Saturday 16 May 2020

भारतीय आहाराचे वेगळेपण आणि गुण

आहार हा शरीराला तृप्त करणारा, शीघ्र बल देणारा असतो. आयु (जीवन), तेज (कांती), उत्साह, स्मृती, ओज (जीवनीय शक्ती) आणि अग्नी वाढविणारा आहे. अन्न हे पूर्णब्रह्म आहे असे मानणारी आपली परंपरा आहे. म्हणजेच धान्य, भाज्या साठविण्यापासून तर ते ग्रहण करण्यापयर्ंत अलिखित नियम आजही अनेक घरांमध्ये पाळले जातात. खरेच त्याला महत्त्व आहे का? आहाराचा परिणाम स्वास्थ्यावर कसा आणि किती होतो?
भारतीय आहाराचे वेगळेपण आणि गुण काय आहेत हे सध्याच्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अभ्यासणे महत्त्वाचे ठरेल. कोरोनाचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती (इम्यून पॉवर) वाढवा, असे आवाहन आता केले जात आहे. भारतीय लोक हे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी अतिशय पद्धतशीर असा आहार घेत आले आहेत.
आपण धान्य साठवण्याचे काम त्या-त्या ऋतूनुसार करतो. वर्षभराचा गहू-तांदूळ, डाळी, मसाले ऋतूनुसार घेऊन ते वाळवून जेव्हा ते वापरण्यात येतात तेव्हा ते पचायला सोपे होतात व पचन चांगले राहते. आयुर्वेदात लठ्ठपणा, मधुमेह आदी व्याधींचे एक कारण हे नवधान्यसेवन सांगितले आहे. कारण नवे धान्य हे पचायला जड असते. ते खाल्ल्यास पचनसंस्था बिघडून व्याधी होतात. आज घरे लहान झाली, बंगले, वाडे जाऊन फ्लॅट आले. त्यामुळे धान्य फारसे साठविले जात नाही; पण खेड्यापाड्यात आजही ती पद्धत आहे. आहाराचे सहा रस सांगितले आहेत. गोड, आंबट, खारट, कडू, तिखट, तुरट हे सहा रस आहारात असतील तर आरोग्य उत्तम राहते. भारतीयांची चौरस आहारपद्धत पूवार्पार आहे. वरण, भात, भाजी, पोळी, कोशिंबीर, लिंबू, मीठ हे आपल्याकडे अन्नात असते. त्यामुळे साहजिकच सर्व रस आपण सेवन करतो. ऋतूनुसार भाज्या, कोशिंबिरी आपण बदलतो. त्या-त्या ऋतूच्या गरजेनुसार आहारात बदल होतात. त्यामुळे ऋतुबदलाचा भारतीयांवर फारसा विपरीत परिणाम होत नाही. स्वयंपाक करताना भाज्या, आमटीत आपण हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता, आलं, लसूण यांचा वापर करतो. आहाराच्या पचनासाठी हे सगळे मदत करतात.
जुनी माणसं आपल्याला नेहमी सांगत आली आहेत की, बाहेरून आला की पहिले हातपाय धुवायचे. आज कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सॅनिटायझेशन हा शब्द परवलीचा बनला आहे. आमचे पूर्वज ते वषार्नुवर्षे करीत आले आहेत. शरीरासोबतच मनाची स्वच्छता भारतीय संस्कृतीत महत्त्वाची मानली जाते म्हणून सद्विचारांचे पाठ एक पिढी दुसर्‍या पिढीला देत आली आहे. आयुर्वेदात देशकालानुसार तसेच वय, मात्रा, बल, प्रकृतीनुसार आहारसेवन करण्यास सांगितले आहे. उदा. कोकणात ओले खोबरे वापरतात तर विदर्भात सुके खोबरे. उत्तर भारतात सरसोचे तेल वापरले जाते, दक्षिणेत खोबरेल तेल वापरतात तर आपल्याकडे शेंगदाणा, सोयाबीन तेल वापरतात. ऋतूंनुसार आहारात भारतीय माणूस बदल करतो.
आहार कसा घ्यावा याचे एक शास्त्र आहे. खूप हळू आणि खूप घाईघाईनेही जेवण करू नये. जेवताना जास्त बडबड करू नये, गरम, ताजे जेवावे या आपल्याकडे पूवार्पार पाळल्या जात असलेल्या बाबींची आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्यकता असल्याचे तज्ञ सांगत आहेत. या संकेत/नियमांचे पालन न केल्याने आजकाल शारीरिक, मानसिक व्याधी वाढत आहेत.
विरुद्ध आहार टाळावा असे आपल्या घरातील वडीलधारी लोक सांगत आले आहेत. त्याला आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक आधार आहेच. दही व मासे एकत्र खाऊ नयेत, दूध आणि मीठ एकत्र सेवन करू नये, रात्री दही खाऊ नये, थंडीत थंड गोष्टी तर गरमीत गरम (जसे उग्र मसाले, लसणाचा अतिवापर) खाऊ नये हे आपले आहारशास्त्र सांगते. त्याच्या विरुद्ध केले तर त्याचा पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. आपल्या पचनसंस्थेला एक दिवस आराम मिळावा ही उपवासामागची संकल्पना आहे. आपल्या पचनसंस्थेची सायकल नीट चालण्यासाठी उपवास उपयुक्त आहेत. भारतीयांनी हे शेकडो वर्षांपूर्वीच जाणले आहे. आता कोरोनाच्या सावटाखाली असलेले जग भारतीय आहारशास्त्राकडून काही शिकेल, अशी अपेक्षा करू या.

No comments:

Post a Comment