अनेकांना जीममध्ये जायचा कंटाळा येतो. तिथला व्यायाम वैतागवाणा वाटतो. अशावेळी तुम्ही डान्सिंगचा पर्याय निवडू शकतो. नृत्य हा सुद्धा व्यायामाचा खूप चांगला पर्याय आहे. नृत्याकडे नेहमीच छंद म्हणून बघितलं जातं. पण प्रत्यक्षात फिटनेसच्या दृष्टीने नृत्याचे अनेक लाभ आहेत. नियमित नृत्य केल्याने बर्याच कॅलरी खर्च होऊ शकतात. नृत्यप्रकार कोणाताही असला तरी त्याचे तितकेच लाभ होतात. तुम्ही या नृत्याचा आनंद घेणं गरजेचं आहे.
नृत्यामुळे खर्च होणार्या कॅलरींचं प्रमाण व्यक्तीसापेक्ष बदलतं. शरीराची रचना , नृत्याचा प्रकार आणि तीव्रता यावरही किती कॅलरी खर्च होणार हे ठरतं. पण सर्वसाधारणपणे सौम्य नृत्य करताना ५६ किलो वजनाची व्यक्ती दर मिनिटाला साडेपाच कॅलरी खर्च करते. म्हणजे ताशी ३३0 कॅलरी खर्च होतात.
पण फक्त नृत्य केल्याने तुमचं वजन कमी होणार नाही. यासोबतच शरीरात जाणार्या कॅलरींचं प्रमाणही कमी करायला हवं. एक किलो फॅट्स कमी करण्यासाठी आठवड्याभरात ३५00 कॅलरी कमी करायला हव्यात. तसंच किमान तासभर नृत्य करायला हवं. यामुळे १0 ते ११ दिवसात तुमचं एक किलो वजन कमी होऊ शकेल. फक्त व्यायाम केल्याने वजन कमी होत नाही तर आहावरही नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. या दोहोंचा समतोल साधून तुम्ही फिट राहू शकता.
नृत्याचे इतरही अनेक लाभ आहेत. यामुळे हृदयाला बळकटी मिळते. शरीराचं संतुलन साधण्याची कला तुम्ही अवगत करू शकता. शारीरिक क्षमता वाढायला मदत होते. नृत्याचा शरीरासोबतच मेंदूलाही लाभ होतो. यामुळे बुद्धी तल्लख होते. मेंदूला चालना मिळत असल्याने त्याची कार्यक्षमता सुधारते.
शरीराची लवचिकता वाढण्याच्या दृष्टीनेही नृत्य उपयुक्त ठरतं. धकाधकीचं आयुष्य जगणार्यांनी तर नृत्य करायला हवं. यामुळे ताण कमी व्हायला मदत होते. नृत्यामुळे शरीरात सकारात्मक लहरी निर्माण होत असल्याने मूड चांगला होतो. त्यामुळे सर्वांगिण आरोग्यासाठी नृत्य करायला हरकत नाही.
No comments:
Post a Comment