Sunday 12 September 2021

अंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवा


रोज अंघोळ करावी. शक्यतो गरम पाण्यानं करावी. त्यानं अंगावर साचून राहिलेले सूक्ष्म जंतू काही प्रमाणात नष्ट होतात. अंघोळ करताना शक्यतो कोणत्याही प्रकारचा साबण वापरू नये, तेलं वापरू नयेत, शाम्पू वापरू नयेत. साबण, तेलं, शाम्पू कोणत्याही पॅथीचे असोत, त्यांत त्वचेला आणि शरीराच्या घर्मछिद्रातून आत जाऊन आतल्या शरीराला हानी पोहोचवणारी रसायनं असतात. कितीही पाणी घेऊन अंघोळ केली तरी यातली काही रसायनं शरीराला चिकटून राहतात. 

अंघोळ करताना आपल्या हातांनी संपूर्ण अंग चोळावं. अंगाचा प्रत्येक भाग नीट चोळून अंघोळ करावी. जिथंपर्यंत हात पोहोचेल तिथपर्यंत पाठही चोळावी. लहान वयापासून स्वतःची पाठ चोळायची सवय असेल तर पुढं वाढत्या वयात आणि वृद्धत्वात पाठीच्या प्रत्येक भागावर हात पोहोचण्याइतपत हातांचे सर्व स्नायू लवचिक राहतात. (ही सवय नसेल तर पुढं हात पाठीच्या प्रत्येक भागात पोहोचणं अवघड जातं.) 

अंघोळ करताना संपूर्ण अंग आणि विशेषतः संपूर्ण पाठ चोळावीच. ही सवय नियमित असेल तर शरीरातल्या रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. रक्ताभिसरण योग्य प्रकारे होण्यास मदत होते. रक्तपेशींच्या वाढीला मदत होते. रक्तविकार व हृदयविकारापासून स्वतःला वाचवण्यास मदत होते. 

सर्वांनाच लहानपणापासून अंघोळ करताना हातांनी संपूर्ण शरीर चोळून अंघोळ करण्याची सवय असायला हवी, पण विशेषतः जे लोक बैठं काम करतात, त्यांनी तर आवर्जून ही सवय बाळगायला हवी. 

ज्यांचा हात संपूर्ण पाठीवर पोहोचत नाही, त्यांनी दुसऱ्याकडून आठवड्यातून दोनतीन वेळा तरी अंघोळ करताना पाठ चोळून घ्यावी. 

ही सवय आरोग्यदायी आणि शरीराच्या अनेक आजारांपासून आणि विकारांपासून दूर ठेवणारी आहे.