Friday 19 February 2021

सकाळी लवकर उठणे सर्वांसाठी फायदेशीर


अनेक यशस्वी लोकांना सकाळी उठून आपली कामे करण्यास पुरेसा वेळ मिळतो. ठरलेल्या नियोजन, कामाव्यतिरिक्त कामे करण्यासाठी त्यांना वेळ मिळतो. लवकर उठल्याने त्यांचे आरोग्य टिकून राहते. दवाखान्यात ढिगभर पैसे घालवण्याची वेळ त्यांच्यावर सहसा येत नाही. त्यामुळे लवकर उठून उत्साहाने, सकारात्मक विचारांनी कामाला सुरवात झाल्यास आपल्या कामात यश हमखास मिळते. सकाळी लवकर उठल्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात फ्रेश होते. उत्साह येतो. दिवसभर आपल्याला कोणती कोणती कामे करायची आहेत, हे पटकन सुचते. ती कामे पूर्णत्वास होण्यासाठी आपले प्रयत्न सुरू होतात. सकाळी लवकर उठून तुम्ही मॉर्निंग वॉक, जीम अथवा घरच्या घरी व्यायाम करू शकता. शुध्द हवेत ऑक्सिजन मुबलक प्रमाणात असल्यामुळे तुम्ही फ्रेश वातावरणात रनिंग (पळायला, चालायला) जाऊ शकता. घरी पूजा, प्रार्थना वेळेवर करता येतात. घरातील अन्य व्यक्तींना त्यांच्या कामात मदतही करू शकता. सकाळी उठून शांत वातावरणात अभ्यासही करता येतो. काही वेळा वेळ झाला म्हणून आपण नाष्ता करत नाही. न खाताच आपण बाहेर पडतो. पण, सकाळी नाष्ता खाणे, आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. काही जण जेवूनच बाहेर पडतात. अशावेळी नाष्ता किंवा जेवायला पुरेसा वेळ मिळतो. वेळेवर रेल्वे, बस मिळावी म्हणून पटपट कामे आवरून बाहेर पडू शकता. वेळेवर शाळा, कॉलेज, कामाला जाऊ शकता. मग, इथे तुमची धावपळ होणार नाही. अगदी पळापळ न करता, तुम्ही ही सर्व कामे आटोपशीर आणि व्यवस्थितपणे पार पाडू शकता. सकाळी लवकर उठून जर तुम्ही बाहेर फिरायला गेलात तर निसगार्चा आनंद तुम्हाला घेता येईल. सूर्योदय पाहणे, हे अनेकांना जमत नाही. पण, लवकर उठून गेल्यानंतर उगवता सूर्य पाहणे, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणे, एकांत आणि शांत वातावरणात चालणे, हे सर्व तुम्हाला तुमचे मानसिक आरोग्य जपायला कारणीभूत ठरते. चालल्याने, रनिंग, मेडिटेशन, व्यायाम केल्याने तुमचे आरोग्य सुधारते. तुम्ही फिट राहू शकता. जे लोक लठ्ठ आहेत, त्यांच्यासाठी तर लवकर उठून व्यायाम करणे, वॉकिंगला जाणे आवश्यक आहेत. शरिरातील अतिरिक्त चरबी करण्यासाठी हा सर्वात चांगला पर्याय आहे. काही जण मोकळ्या हवेत फिरतात, तर काही जण मैदान निवडतात, काहींना बागेत हिरव्यागार गवतावर अनवाणी चालायला आवडते. यामुळे तुम्ही मानसिक तणावापासून दूर राहू शकता. अनेक वेगवेगळ्या आयडिया तुम्हाला सूचतात. आत्मविश्‍वास वाढण्याबरोबरच स्फूर्ती येते. हा उत्साह रात्रीपर्यंत कायम टिकून राहतो.