Sunday, 31 May 2020

कफ-खोकल्यावर घरगुती उपाय

पावसाळा म्हटलं की भिजणं आलं आणि भिजल्यावर आधी सर्दी व त्यामागून खोकला येतोच. सर्दी दोन दिवसांत बरी होते, पण खोकला बरेच दिवस सतावतो. अशावेळी काही घरगुती उपाय असतात ते पाहुया. गरम दुधात एक चमचा हळद घालून ते दूध प्यावं. हा उपाय सगळ्या वयोगटांसाठी उपयुक्त ठरतो.हळद अँटिव्हायरल आणि अँटिबॅक्टेरिअल असते, जी घशातल्या खवखवीशी लढण्यास मदत करते.

जेष्ठमधाच्या कांड्या चघळल्या तर कफ सुटायला मदत होते.
अर्धा चमचा भाजून बारीक केलेली आळशी आणि एक चमचा ज्येष्ठमधपूड दीड कप पाण्यात उकळवून, तो गाळून, त्यात चवीपुरती खडीसाखर घालून गरमागरम प्यावे. या उपायानेही कफ चटकन सुटतो.
लिंबू आणि मधाचा वापर सर्दी-खोकल्यात उपयुक्त ठरतो. दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्यावा. तुळस आणि आलं सर्दी-खोकल्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. याच्या सेवनानं लगेच आराम पडतो. एक कप गरम पाण्यात तुळशीची पाच-सात पानं, त्यात आल्याचा एक तुकडा टाकावा. त्याला काही वेळ उकळून काढा तयार करावा.जेव्हा पाणी अगदी अर्धं होईल, तेव्हा तो काढा प्यावा. लहानांसोबत मोठ्यांसाठीही हा उपाय फायद्याचा ठरेल.

No comments:

Post a Comment