Wednesday 6 May 2020

.. म्हणून जडतो हृदयविकार

हृदयविकार आणि पक्षाघात या विकारांमुळे भारतात अनेकांचा मृत्यू होतो. अनेक कारणांमुळे आपलं हृदय धोक्यात येतं. हृदयविकाराचा झटका हा अत्यंत धोकादायक असा आजार आहे. हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा कमी होत पूर्णपणे थांबला की हृदयविकाराचा झटका येतो. हृदयाच्या पंपिंगच्या क्षमतेवर परिणाम झाल्याने हृदयक्रिया बंद पडू शकते. यासोबतच हृदयाच्या भित्तीकांशी संबंधित विकार असतात. तसंच हृदयाच्या ठोक्यांची अनियमितताही हृदयविकाराला निमंत्रण देते.
सध्याच्या धकाधकीच्या काळात हृदयाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.  मधुमेहामुळे हृदयविकार होऊ शकतो. मधुमेहामुळे हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो. निरोगी व्यक्तीच्या तुलनेत मधुमेहींना हृदयविकाराचा धोका तीन ते चार पटींनी अधिक असतो. उच्च रक्तदाब हादेखील हृदयाचा खूप मोठा शत्रू आहे. उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर असंही म्हटलं जातं. सुरुवातीला या विकाराची फारशी लक्षणं दिसून येत नाहीत. वेळोवेळी रक्तदाब तपासत रहाणं गरजेचं आहे. यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका लवकर ओळखता येतो. उच्च रक्तदाबाशी संबंधित काही गैरसमजही आहेत. घरात उच्च रक्तदाबाचा इतिहास असेल तर प्रतिबंध करता येत नाही असं अनेकांना वाटतं. मात्र योग्य जीवनशैलीचा अवलंब केल्यास हा धोका टाळता येऊ शकतो.
आहारात मिठाचं प्रमाण कमी असल्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होणार नाही असा काहींचा समज असतो. प्रत्यक्षात आपण विविध मार्गांनी सोडियमचं सेवन करत असतो. सॉस, सूप, बिस्किटे, प्रक्रिया केलेले पदार्थ यात भरपूर मीठ असतं. आपल्या शरीरात ७५ टक्के सोडियम याच मार्गाने जातं. त्यामुळे अशा पदार्थांमधलं सोडियमचं प्रमाण जाणून घ्यायला हवं.
उच्च रक्तदाबाची लक्षणं दिसत नसल्याने उपचार घेण्याची गरज नसल्याचा बर्‍याचजणांचा समज असतो. मात्र अनेकदा उच्च रक्तदाबाची लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे नियमित तपासणी, औषधोपचार गरजेचे ठरतात. नियमित मद्यपान, अल्कोहोलच्या अतिरिक्त सेवनामुळेही उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. यामुळे हृदयविकार किंवा पक्षाघाताचा झटका येऊ शकतो. त्यामुळे मद्यपान प्रमाणात करावं.

No comments:

Post a Comment