Friday 22 May 2020

'तोंड येणे' अशी घ्या काळजी

मला ना सारखं तोंड येतं. मग चांगले पदार्थ खाता येत नाही की, गरम काही पितासुद्धा येत नाही," ही समस्या प्रत्येकाला कधी ना कधी जाणवतेच जाणवते. तोंडाच्या आतील भागात फोड येणे, लाल होणे, काहीही खाताना जिभेची, हिरड्यांची आग होणे, तिखट, खारट आणि आंबट जराही सहन न होणे अशा तक्रारी यात जाणवतात. यात ओठ, जीभ, पडजीभ, घसा, टाळा यांना सूज येते. त्यामुळे आपल्याला काहीही खाता येत नाही आणि नीट गिळतादेखील येत नाही. हे दुखणे फार मोठे नसलं तरी त्याचा त्रास खूप होतो. वारंवार तोंड येण्यावर त्यामुळे वेळीच योग्य ते उपचार घेणे महत्वाचे आहेत.

कारणे काय?
◆ शरीरात अतिरिक्त उष्णता वाढणे. एखाद्या आजारावर दीर्घकाळ औषधे घेत असल्यास त्या औषधांचे साईड इफेक्ट होऊनही तोंड येते. अति प्रमाणात चहा, कॉफी किंवा तंबाखूचे सेवन, अति धुम्रपान, अति प्रमाणात तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे.
◆ पचनाच्या तक्रारी असलेल्यांनाही तोंड वारंवार येते. विशेषतः पोट साफ नसल्यास दातांचे विकार असल्यास किंवा दात झिजून टोकदार झाल्यास ते लागून तोंडात व्रण उठतात.
◆ कुपोषण किंवा जीवनसत्वाच्या अभावामुळेही तोंड येते.
ही काळजी घ्या...
◆ तोंड आल्यानंतर वेदना कमी करून तात्पुरते बधीरत्व आणणारी मलमे सध्या उपलब्ध आहेत. त्याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने करा.
◆ उष्णतेने तोंड आले असल्यास नारळपाणी, सौम्य चवीचे सूप, थंड दूध असे पदार्थ आहारात घ्यावेत.
◆ आहार चौरस आणि सर्व पोषक द्रव्यांचा पुरवठा होईल, असा असावा. अति तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
◆ तोंडाची नियमित आणि योग्य प्रकारे स्वच्छता करावी.
◆ जेवणाच्या वेळा पाळाव्यात. रात्रीची झोप व्यवस्थित आणि पुरेशी घ्यावी.
◆ फास्ट फूड, जंक फूड घेऊ नये. अति थंड, अति गरम असे पदार्थ खाऊ नयेत.
◆ उन्हाळ्यामध्ये मांसाहार शक्यतो टाळावाच.
◆  तोंड आल्यावर जिरे चावून खाल्ल्यानेही फायदा होतो.
◆ अति जागरण, मानसिक ताण तणाव, ब-१२
जीवनसत्वाचा अभाव, अवेळी जेवणे यामुळे तोंड येण्याची समस्या जाणवते. तोंड आल्यानंतर अति गरम, अति थंड पदार्थ घेऊ नयेत. तिखट, मसालेदार पदार्थ खाण्यातून वर्ण्य करावेत.

No comments:

Post a Comment