Sunday 12 September 2021

अंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवा


रोज अंघोळ करावी. शक्यतो गरम पाण्यानं करावी. त्यानं अंगावर साचून राहिलेले सूक्ष्म जंतू काही प्रमाणात नष्ट होतात. अंघोळ करताना शक्यतो कोणत्याही प्रकारचा साबण वापरू नये, तेलं वापरू नयेत, शाम्पू वापरू नयेत. साबण, तेलं, शाम्पू कोणत्याही पॅथीचे असोत, त्यांत त्वचेला आणि शरीराच्या घर्मछिद्रातून आत जाऊन आतल्या शरीराला हानी पोहोचवणारी रसायनं असतात. कितीही पाणी घेऊन अंघोळ केली तरी यातली काही रसायनं शरीराला चिकटून राहतात. 

अंघोळ करताना आपल्या हातांनी संपूर्ण अंग चोळावं. अंगाचा प्रत्येक भाग नीट चोळून अंघोळ करावी. जिथंपर्यंत हात पोहोचेल तिथपर्यंत पाठही चोळावी. लहान वयापासून स्वतःची पाठ चोळायची सवय असेल तर पुढं वाढत्या वयात आणि वृद्धत्वात पाठीच्या प्रत्येक भागावर हात पोहोचण्याइतपत हातांचे सर्व स्नायू लवचिक राहतात. (ही सवय नसेल तर पुढं हात पाठीच्या प्रत्येक भागात पोहोचणं अवघड जातं.) 

अंघोळ करताना संपूर्ण अंग आणि विशेषतः संपूर्ण पाठ चोळावीच. ही सवय नियमित असेल तर शरीरातल्या रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. रक्ताभिसरण योग्य प्रकारे होण्यास मदत होते. रक्तपेशींच्या वाढीला मदत होते. रक्तविकार व हृदयविकारापासून स्वतःला वाचवण्यास मदत होते. 

सर्वांनाच लहानपणापासून अंघोळ करताना हातांनी संपूर्ण शरीर चोळून अंघोळ करण्याची सवय असायला हवी, पण विशेषतः जे लोक बैठं काम करतात, त्यांनी तर आवर्जून ही सवय बाळगायला हवी. 

ज्यांचा हात संपूर्ण पाठीवर पोहोचत नाही, त्यांनी दुसऱ्याकडून आठवड्यातून दोनतीन वेळा तरी अंघोळ करताना पाठ चोळून घ्यावी. 

ही सवय आरोग्यदायी आणि शरीराच्या अनेक आजारांपासून आणि विकारांपासून दूर ठेवणारी आहे.

Sunday 16 May 2021

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हिरवी मिरची उपयुक्त


सध्या जगावरील कोरोनाचे संकट आणखी गंभीर होताना दिसत आहे. अशा संकटकाळात आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. याशिवाय विशेषज्ज्ञ लोक काय खावे आणि काय खाऊ नये? याबद्दल मार्गदर्शन करताना दिसतात. मात्र, कोरोना काळात आपले शरीर मजबूत करून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हिरवी मिरची अत्यअंत उपयुक्त एका नव्या संशोधनात आढळून आहेत. मात्र, जर तुम्ही रोज हिरव्या मिरचीचे सेवन करत असाल तर तुम्हाला त्याचे फायदे माहीत नसणार. खाण्यात तिखटपणा आणणारी ही मिरची आरोग्यासाठीही तितकीच उपयुक्त आहे.  नियमितपणे हिरवी मिरची खाऊन आपण  अनेक आजारांना दूर ठेवू शकतो.  हीच हिरवी मिरची वजन कमी करण्यापासून ते ब्लड सर्क्युलेशन सुरळीत आणि वेगाने करण्यास मदत करते. हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए, बी ६, आयरन, कॉपर, पोटॅशियम, प्रोटिन आणि कार्बोहायड्रेटचे भरपूर प्रमाणात असतो. याशिवाय यामध्ये बीटा कॅरोटिन, क्रिप्टोक्सान्सिन, लुटेनजॅक्सन्थिन आणि आरोग्यवर्धक घटक असतात. जे शरीर तंदुरुस्त ठेवण्यात मदत करतात.

कोरोनाकाळात तर विशेषज्ज्ञ हिरवी मिरची खाण्यास प्राधान्य द्या, असा सल्ला देताहेत. याचे कारणही तसेच आहे. हिरव्या मिरचीमध्ये इम्युनिटीला मजबूत करण्याची क्षमता असते. याशिवाय यामध्ये अँटिबॅक्टेरियल गुण असतो. त्यामुळे आपले शरीर बॅक्टेरियापासून दूर राहू शकते. तसेच या मिरचीमुळे रक्त शुद्ध होते व ते वेगाने प्रवाहीत होण्यास मदत मिळते.

 मिरची खाण्याचे आणखीही काही फायदे – भाजीसोबत खाल्ली जाणारी  हिरवी मिरची आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मिरचीमध्ये व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. हिरवी मिरची आपल्या पचन तंत्रासाठी खूप लाभदायक आहे. आपल्या अन्नामध्ये फायबर अधिक प्रमाणात आढळते.  हिरवी मिरची  फायबर पचवण्यास मदत करते. हिरवी मिरची ब्लड शुगर लेव्हल कमी करते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी मिरची खाणं गरजेचे आहे. हिरवी मिरची  शरीरातील मेद कमी करुन मेटाबॅालिजम वाढवते.हिरव्या मिरच्यामध्ये असलेले पोषक घटक आपल्या शरीराचे बॅक्टेरिया नष्ट करतात.


स्ट्रॉबेरी स्मरणशक्ती वाढवते


अनेकांना छोट्या छोट्या गोष्टीही विसरण्याची जणू काही सवयच असते. अशा लोकांना स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारातील काही सुधारणा लाभदायक ठरू शकतात. भोपळ्याच्या बियांसारखे आहारातील काही पदार्थ यासाठी उपयुक्त ठरतात. आता 'न्यूट्रिएंटस्' या नियतकालिकात म्हटले आहे की स्ट्रॉबेरीचे सेवन यासाठी गुणकारी ठरू शकते.

रश युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे अध्ययन केले आहे. स्ट्रॉबेरीमध्ये फ्लॅवेनॉईड आणि 'क' जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आढळते. हे दोन्ही अँटी ऑक्सिडेटिव्ह' म्हणून ओळखले जातात. ते फ्री रॅडिकल्सना चेतासंस्थेतील पेशींचे नुकसान करण्यापासून रोखतात. त्यामुळे उतारवयात स्मरणशक्ती कमजोर होण्याची समस्या राहत नाही.

एकाच वेळी अनेक कामे करणे, योग्य-अयोग्य हे समजून घेणे तसेच निर्णयक्षमता यासाठी त्यांचा लाभ होतो. अल्झायमर्स व डिमेन्शियासारख्या उतारवयातील विस्मृतीशी संबंधित आजारांना रोखण्यासाठीही स्ट्रॉबेरी लाभदायक ठरते. पाहणीमध्ये आढळले की ज्या लोकांनी आठवड्यातून दोन ते तीनवेळा स्ट्रॉबेरी खाल्ली त्यांना या दोन्ही आजारांचा धोका ३४ टक्क्यांनी कमी झाला. हृदयरोग व स्ट्रोकपासून वाचवण्यासाठीही स्ट्रॉबेरी गुणकारी आहे, असे यापूर्वी दिसून आले होते.

स्ट्रॉबेरीचे आणखीही काही फायदे : यात सोडियम, चरबी, कोलेस्ट्रॉल नसते आणि कमी कॅलरीयुक्त आहार म्हणून स्ट्रॉबेरी उत्तम पर्याय आहे. स्ट्रॉबेरीमध्ये मॅंगनीज, व्हिटामिन सी, पोटॅशियम आणि व्हिटामिन बी 9 असते.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील हे फळ चांगले मानले जाते आणि म्हणूनच हंगामात स्ट्रॉबेरी खाणे आवश्यक आहे. जर आपण ताजे स्ट्रॉबेरी घेऊ शकत असाल, तर ते चांगले आहे. कारण स्ट्रॉबेरीचे सेवन आपल्याला हृदयरोग आणि मधुमेहपासून मुक्त करू शकते. आपण कोणत्याही प्रकारे स्ट्रॉबेरी खाऊ शकता, परंतु या हंगामात ते आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजे.

Thursday 13 May 2021

मधुमेहाच्या रुग्णांना दालचिनीचे सेवन लाभदायक


दालचिनी
 हा एक मसाल्याचा पदार्थ आहे,हे आपल्याला माहीत आहे. स्वयंपाकघरात वापरावयाची दालचिनी म्हणजे झाडाच्या आतील खोडाच्या सालीची पुंगळी असते. पारंपरिक काळापासून दालचिनीचा स्वयंपाकात व आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला गेला आहे. दालचिनीला कलमी देखील म्हंटले जाते. दालचिनी हा एक अत्यंत स्वादिष्ट मसाला आहे. हा त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी हजारो वर्षांपासून प्रसिद्ध आहे. दालचिनी हा एक मसाला आहे जो वैज्ञानिकदृष्ट्या दालचिनी म्हणून ओळखला जातो, तो झाडांच्या आतील सालातून बनविला जातो. जेव्हा ते कोरडे वाळते, तेव्हा त्याच्या पट्ट्या बनवतात ज्या रोलमध्ये गुंडाळतात, ज्याला दालचिनी स्टिक्स म्हणतात. याचा मधुमेही लोकांना फायदा होतो, असे अलीकडच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील शर्करेचा स्तर नियंत्रित
ठेवणे एखाद्या आव्हानासारखेच असते. त्यासाठी त्यांना रोजच अनेक प्रकारची सावधगिरी बाळगावी लागत असते. मधुमेहामुळे अनेक प्रकारच्या खाण्या-पिण्यावर निर्बंध येत असतात. अशा स्थितीत दालचिनीचे सेवन करणे मधुमेहाच्या रुग्णांना लाभदायक ठरू शकते, असे संशोधकांना आढळले आहे.
एंडोक्राईन सोसायटीच्या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार थोड्या दालचिनीचे सेवन किंवा दिवसातून तीनवेळा
दालचिनीच्या कॅप्सूल्स खाल्ल्याने शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे किंवा वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी मदत मिळू शकते. याबाबतची पाहणी 51 प्रो-डायबिटिक रुग्णांवर करण्यात आली होती. त्यांना दिवसातून तीनवेळा 500 मिलीग्रॅम दालचिनी
कॅप्सूल्स देण्यात आले. अनेक भारतीय खाद्यपदार्थांमध्ये दालचिनीचा वापर करण्यात
येतो. भारतीय मसाल्यांमध्ये या 'सिनामोमम' झाडाच्या खोडातील सालीचा शेकडो वर्षांपासून वापर केला जातो. दालचिनीत 'सिनामाल्डेहाईड' नावाचे संयुग असते. ते चयापचय क्रिया व आरोग्यासाठी गुणकारी असते. दालचिनीत अँटिऑक्सिडंटसही असतात. तसेच दालचिनीतील अँटइन्फ्लेमेटरी गुण शरीराचे संसर्गापासून रक्षण करते. हृदयाच्या आरोग्यासाठीही दालचिनी गुणकारी आहे.

Sunday 2 May 2021

पोषण घटकांचे भांडार :अळू


चटकमटक खाण्याची सवय असलेली माणसं अळू, मेथी,शेपू अशा भाज्यांकडे पाहून तोंड वेंगाडतात. मात्र, अशा अनेक भाज्यांमध्ये शरीराला आरोग्य प्रदान करणारे अनेक पोषक घटक असतात हे विसरले जाते. तज्ज्ञांनी म्हटले आहे की शरीरातील पोषक घटकांची कमतरता दूर करण्यासाठी अळूसारख्या भाज्या अत्यंत लाभदायक आहेत. अळूमध्ये पोषक घटकांचे भांडारच असते. अळू हे कार्बोहायड्रेटस् आणि प्रोटिनचे उत्तम स्रोत असते. अळूच्या कंदामध्ये बटाटा किंवा रताळ्यापेक्षाही अधिक स्टार्च असते. अळूच्या पानांमध्ये 'अ' जीवनसत्त्व, फॉस्फरस, कॅल्शियम, आयर्न आणि बीटा कॅरोटिन असते. नवी दिल्लीतील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. आनंद कुमार सिंह यांनी सांगितले की अळूच्या प्रत्येक पानात एस्कार्बिक अॅसिड, फोलिक अॅसिड, रायबोफ्लेविन, 'ब' जीवनसत्त्व, बी-सायटोस्टेरॉलसारखे घटक असतात. अनेक खनिजे अळूच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. 'थियोनिन' नावाचे अमिनो अॅसिडही अळूच्या पानांमध्ये असते. शरीरात रक्ताची कमतरता असल्याचे अळू उपयुक्त ठरतो. 

अळूची पानांना ‘अरबी के पत्ते’ किंवा ‘कोलोकॅशिया लीव्हज्’ असे म्हटले जाते.  हे संपूर्ण झाडच पोषणयुक्त आहे.  अळूची पाने, त्याचे देठ आणि मुळेसुद्धा स्वयंपाकात वापरली जातात आणि त्यांच्यातून खूप उच्च पोषण मिळते. मात्र, हे घटक कधीही कच्चे खाता कामा नयेत. अळूची पाने अगदी सहज उपलब्ध होतात आणि  स्वस्त असतात.  अळू अँटिऑक्सिडंट्सने युक्त असतो आणि त्यामुळे आजार रोखण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी अळू खूप चांगला असतो. अळू हा व्हिटॅमिन ‘ए’चा अतिशय चांगला स्रोत आहे. दृष्टी सुधारण्यासाठी हे व्हिटॅमिन अतिशय महत्त्वाचे असते.   व्हिटॅमिन ‘सी’चा उत्तम स्रोत; जो प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करतो.   त्यांच्यात पोटॅशिअम आणि फोलेटही उत्तम प्रमाणात असते; ज्यामुळे तुमचे हृदय आरोग्यदायी राहते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.  या पानात असलेले फायबर्स (तंतू) तुमची पचन यंत्रणा उत्तम राहण्यासाठी मदत करतात.   अळूमध्ये लोह, फॉस्फरस, झिंक, व्हिटॅमिन ‘बी ६’, व्हिटॅमिन ‘सी’, कॉपर आणि मॅंगेनीझही असते. हे सगळे घटक आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. 

अळूमुळे रक्तदाब कमी होऊ शकतो, त्वचेची जपणूक होते.  पचनशक्ती सुधारते. पचन यंत्रणा मजबूत होते.  हृदयरोगांना प्रतिबंध होतो.  दृष्टी सुधारते.  प्रतिकारशक्ती वाढते.   स्नायू आणि चेतासंस्था यांची ताकद वाढते.  ढाळ, क्रॅंपिंग, बद्धकोष्ठता, पोट फुगणे, गॅसेस या सगळ्या गोष्टींना अळूमुळे प्रतिबंध होतो आणि शरीराचे एकूण आरोग्य सुधारते. (अनिकेत फिचर्स)


Thursday 29 April 2021

खरबुजाचे आरोग्यदायी फायदे


खरबूज कलिंगडच्या जातीतले एक फळ आहे. खरबूज लंबगोल, अंडाकार आकाराचे आणि पिवळसर रंगाचे असते. खरबूज हे फळ वेल वर्गातील असून ,त्याच्या अनेक जातीही आहेत. फळांचा रंग, आकार, सालीच्या जाडी व चवीनुसार त्यांच्या जातीत बदल होतो. भारतामध्ये उष्ण हवामानाच्या प्रदेशात या फळाची लागवड केली जाते. खरबूज फळामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. त्यामुळे हंगामात खरबुजाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

फळाच्या गरांमध्ये तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. फळांमधून जीवनसत्त्व ए, बी, सी, ई, के व खनिजे मुबलक प्रमाणात मिळतात. फळाच्या सालीमध्ये कॅरोटिनॉईड व फ्लॅवेनोईड ही जीवनसत्त्वे असतात. यातील जीवनसत्त्व अ डोळ्यांच्या आरोग्य राखण्यास फायदेशीर असते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच हृदयाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी मदत करते.

खरबूज फळांमध्ये ९० ते ९५ टक्के पाणी असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या उष्णतेच्या विकारापासून बचाव करण्यासाठी खरबुजाचा ज्यूस उपयुक्त आहे. अतिसारामध्ये शरीरातील पाणी कमी होते. अशावेळी खरबुजाच्या सेवन केल्यास शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. खरबूज फळाची साल किंवा बियांना व्यवस्थित बारीक केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

खरबुजापासून जाम, मिल्क शेक आईस्क्रीम, बर्फी बनवले जात आहेत. -मच्छिंद्र ऐनापुरे

Wednesday 28 April 2021

ड्रॅगन फ्रूटचे आरोग्यदायी फायदे


ड्रॅगन फ्रूटची शेती आपल्याकडे दुष्काळी भागात वाढत आहे. कमी पाण्यात तग धरून राहणारी ही वनस्पती चांगले उत्पन्न देत आहे. आकर्षक रंगाचे ड्रॅगन फ्रूट हे मूळचे मेक्सिको आणि अमेरिका या देशातील आहे. याचे फळ चांगले उत्पन्न देऊन शेतकऱ्याला त्याची आर्थिक उन्नती करण्यास हातभार लावत आहेच,पण हे फळ आरोग्य दृष्टीनेही मोठे लाभदायक आहे.  ड्रॅगन फ्रूटमध्ये प्रथिनांचे चांगले प्रमाण असते. शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासोबतच पचनक्रिया  सुरळीत ठेवण्यासाठीही मदत होते. ड्रॅगन  फ्रूटच्या जातींमध्ये विविधता आढळते. यामध्ये पांढऱ्या रंगाचे गर असलेले लाल रंगाचे फळ, लाल रंगाचे गर असलेले लाल रंगाचे फळ आणि पांढऱ्या रंगाचे गर असलेले पिवळ्या रंगाचे फळ असे प्रकार दिसतात.ही फळे आता मोठ्या प्रमाणात बाजारात दिसू लागली आहेत.

या फळामध्ये भरपूर प्रमाणात 'क' जीवनसत्वाबरोबर कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह, आणि जीवनसत्त्व-ब तसेच 90 टक्के पाणी असते. अल्प प्रमाणात 'क' जीवनसत्त्व असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. फळात भरपूर प्रमाणात तंतूमय घटक असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. शरीरात रक्तपुरवठा नीट होऊन सर्व इंद्रिये व्यवस्थित काम करतात. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तातील साखर कमी होते. कोलेस्टेरॉल कमी असल्याने हृदय विकाराचा धोका राहत नाही. यामध्ये बीटा कॅरोटीन असल्याने रक्तदाब, हृदय विकारावर मात करता येते.

ड्रॅगन फळामध्ये उपलब्ध असणारे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, ओमेगा-3 आणि ओमेगा-6 वाईट कोलेस्टेरॉलला वाढू देत नाही. यातील लोह रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते आणि अॅनिमिया होऊ देत नाही. फळाचा आहारात समावेश असल्यास संधिवाताच्या वेदना कमी होतात. दात व हाडे मजबूत होतात. फळांचे सेवन केले तर रोगप्रतिकार शक्ती वाढते. फळांमधील लायकोपेन विकर आणि 'क' जीवनसत्त्व असते. फळाच्या सालीमध्ये पॉलीफेनॉल असते. चेहऱ्यावरचे फोड, रुक्ष केस, केस गळणे, उन्हाने काळवंडून गेलेल्या त्वचेवर हे फळ उपयोगाचे आहे.

ड्रॅगन फ्रूटपासून जॅम, जेली आणि सरबत करता येत असल्याने फ्रूट प्रक्रियेला संधी आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Wednesday 21 April 2021

फायदे नारळ पाणी पिण्याचे


• नारळ पाण्यामध्ये इलेट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मैंगनीज, जीवनसत्व क आणि फोलेट यासारखे पौष्टिक घटक असतात.

• नारळ पाण्यात नैसर्गिक साखर असते. त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा काहीही विपरीत परिणाम होत नाही.

• नारळ पाण्यामध्ये ९४ टक्के पाणी असते. त्यात चरबीचे प्रमाण खूप कमी आहे. २५० मिलि नारळाच्या पाण्यात कर्बाचे प्रमाण-९ ग्रॅम, तंतू-३ ग्रॅम, प्रथिने-२ ग्रॅम, जीवनसत्त्व क- १० टक्के, मॅग्नेशिअम-१७ टक्के, सोडियम- ११ टक्के, कॅल्शिअम- ६ टक्के असते. तसेच ते मानवाच्या शरिरात चांगल्या प्रकारे परिणामकारक ठरते.

• शरीरातील ग्लुकोजची पातळी चांगली ठेवली असल्यामुळे उन्हाळ्यात नारळ पाणी सेवन करणे चांगले असते.

• नारळ पाणी प्यायल्यामुळे पोटातील जळजळ, अल्सर, कोलायटिस, आतड्यांमधील जळजळ यांसारख्या पोटाच्या समस्येपासून आराम मिळतो. तसेच आपल्या शरीरास ऊर्जा देण्याचे कार्य करते. अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे यांसारख्या समस्यांतून सुटका होते.

• नारळाच्या पाण्यात जीवनसत्त्व सी, मॅग्नेशिअम आणि पोटॅशियम यासारखे पोषक गुणधर्म मुबलक प्रमाणात असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

• फेसपॅक म्हणून देखील याचा वापर केला जातो.

• उन्हाळ्यात टॅनिंग काढून टाकण्यासाठी नारळाच्या पाण्याने आपला चेहरा धुतल्यामुळे टॅनिंग कमी होते, चेहरा थंड राहतो.

• नारळ पाणी पिण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो. (अनिकेत फिचर्स)


Tuesday 20 April 2021

दीर्घ श्वसनाचे फायदे


व्यायाम हा तणावमुक्तीसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे नियमित व्यायामाचा फायदा मानसिक आरोग्यासाठीही होतोच. व्यायामातील दीर्घ श्‍वसनाचाही तणावमुक्तीसाठी फायदा होतो. रोज काही मिनिटे दीर्घ श्‍वसन केल्यास तणाव दूर होण्यास मदत होते. मन आणि शरीरालाही आराम मिळतो. त्यामुळेच झोपही चांगली लागते. श्‍वसन योग्य प्रकारे होणेही महत्त्वाचे आहे. श्‍वसन आणि आरोग्य यांचा द.ृढ संबंध असल्याने योग्य प्रकारे श्‍वसन होणे, हे शरीराच्या आरोग्याच्या द.ृष्टीने महत्त्वाचे आहे. दीर्घश्‍वसनाचे अनेक फायदे होतातच. दीर्घ श्‍वसन योग्य प्रकारे कसे केले पाहिजे आणि त्याचे काय फायदे होतात ते जाणून घेऊया.

दीर्घ श्‍वसन कसे करावे?

आराम किंवा सुखासनात बसावे अथवा झोपावे. नाकाने हळूहळू श्‍वास घेण्यास सुरुवात करावी. पोट हवेने भरले पाहिजे. नाकाने हळूहळू श्‍वास बाहेर सोडावा. ही क्रिया करताना एक हात पोटावर आणि दुसरा हात छातीवर ठेवावा. हळूहळू श्‍वास घेताना पोटात हवा भरली जाण्याची क्रिया जाणवू द्या. तसेच श्‍वास सोडताना पोट खाली जाते, त्याचीही जाणीव झाली पाहिजे. जेव्हा आपण श्‍वास घेतो तेव्हा पोटावरील हात हा छातीवरील हाताच्या तुलनेत अधिक वर येतो.

फायदे कोणते?

चुकीच्या पद्धतीने बसल्यास श्‍वासही चुकीच्या पद्धतीने घेतला जातो. जेव्हा आपण दीर्घ श्‍वास घेण्याची क्रिया करतो, तेव्हा शरीर आपोआपच मणकाही ताठ करू लागते. दीर्घ श्‍वसन केल्याने एंडोमॉर्फिन मुक्त होते. एंडोमॉर्फिन चांगले हार्मोन असते. शरीरातील नैसर्गिक वेदनाशामक म्हणून ते काम करते.

दीर्घ श्‍वसन करतो तेव्हा छातीचा भाता वरखाली होतो. त्यामुळे रक्ताभिसरणाला ते प्रोत्साहन देत शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत करते. रक्ताभिसरण वाढल्यामुळे व्यक्तीच्या रक्तामध्ये जास्त ऑक्सिजनचा पुरवठा होतो. ऑक्सिजन वाढल्याने ऊर्जेच्या पातळीतही वाढ होते. दीर्घ श्‍वसन केल्याने शरीरातील आम्लता कमी होते. तणावामुळे शरीरातील आम्लाच्या प्रमाणातही वाढ होते. श्‍वास घेतल्याने तणावही कमी होतो. त्यामुळे पित्तप्रकोप होण्याचे प्रमाणही कमी होते. कार्बन डायऑक्साईड हे नैसर्गिक विषारी टाकाऊ घटक असतात. श्‍वासातून हे विषारी घटक शरीराबाहेर टाकले जातात. याखेरीज दीर्घ श्‍वसनामुळे पचनतंत्रासह शरीरातील सर्वच अवयवांना जास्त ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्यामुळे शरीरातील अवयवांचे कार्य चांगल्या प्रकारे होते. एखाद्या व्यक्तीला जेव्हा खूप राग येतो, तो थकलेला असतो किंवा घाबरलेला असतो तेव्हा त्याचे स्नायू कडक होतात आणि वरवर अपुरा श्‍वास घेतला जातो. काही वेळा श्‍वास थांबतो. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढा ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळत नाही. दीर्घ श्‍वसन केल्यास ही सर्व प्रक्रिया उलट करून शरीर आणि मन शांत करण्यास मदत होते. नियमित व्यायामामध्ये दीर्घ श्‍वसनाचा समावेश केल्यास शरीर आणि मन दोन्हीही तंदुरुस्त राहण्यास मदतच होते.

शेवग्याचे सेवन आरोग्याला हितकारक


आपल्या खाद्यसंस्कृतीत शेवग्याला विशिष्ट असे स्थान आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीला शेवग्याच्या पानांची भाजी आवर्जून केली जाते. शेवग्याच्या फुलांची भाजी, शेवग्याच्या शेंगांची भाजी, शेवग्याच्या शेंगांचे सार, शेंगा, फ्राय, लोणचे तयार करता येते. ओरिसामध्ये शेवग्याच्या शेंगा वापरून छुई आळू पोटळं भजा ही परतलेली कोरडी भाजी बनविली जाते. उडप्यांच्या हॉटेलातील सांबारात शेवग्याच्या शेंगेला विशिष्ट स्थान आहे.. शेवगा गरम, हलका, मधुर, तिखट, अग्निप्रदीपक, रुचकर, दाहकारक, वीर्यवर्धक, पित्त वरक्त प्रकोपक असून, शेवग्याची भाजी वातविकार दूर करणारी आहे. शेवग्याच्या मुळांचा रस काढून किंवा त्याच्या काढ्यात मध घालून घेतल्याने गळू बरे होतात. शेवग्याच्या खोडातून एक भुया रंगाचा डिंक मिळतो. तसेच बियांमधून रंगरहित तेल मिळते. तसेच मोठया प्रमाणात खनिजे आढळतात. शेवग्यापासून जीवनसत्त्व अ, क तसेच ई तयार करतात. पाणी शुद्धीकरणात शेवग्याच्या बियांचा वापर होतो. शेवग्याच्या पानांचा रस प्यायल्याने उचकी थांबते व धाप लागणे कमी होते. शेवग्याच्या पानांच्या रसात चमचाभर साखर घेऊन तो तीन दिवस प्यायल्याने वायूने आलेला गोळा नाहीसा होतो. शेवग्याच्या पानांच्या रसाने डोके चोळले असता डोक्यातील कोंडा निघून जातो.

मस्तकशूळ झाला असल्यास शेवग्याच्या पानांच्या रसात मिरे वाटून त्याचा लेप लावावा. पोट फुगले असल्यास शेवग्याच्या पानांच्या रसाचा काढा तयार करून त्यात हिंग व सुंठ घालून तो प्यावा. वाळलेल्या शेवग्याच्या शेंगांचं चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरलं जातं. तोंड येण्याची समस्या सतावत असलेल्यांनी याच्या पानांचा आहारात समावेश करावा. यात कॅल्शिअम, लोह आणि इतर जीवनसत्त्वांचा भरपूर प्रमाणात साठा असतो. त्यामुळे हाडांची मजबुती राखण्यास मदत होते. शेवग्याचा रस नियमित आहारात घेतल्यास हाडं मजबूत होतात.

रक्तशुद्धीकरण होऊन त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते. रक्तातील साखरेची पातळी कमी करत असल्याने मधुमेही रुग्णांनी शेवग्याचं सेवन करणं आवश्यक आहे. घसा खवखवणे, घसा सुजणे किंवा सर्दी झालेल्या लोकांनी या भाजीचं सूप प्यावं म्हणजे लवकर आराम पडतो. अस्थमा, ब्राँकायटिस आणि क्षयरोग असलेल्या लोकांनी ही भाजी खावी, म्हणजे त्रास कमी होतो. गरोदर महिलांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं, जेणेकरून प्रसुतीपूर्व आणि नंतर होणारे त्रास कमी होतात. तसंच प्रसूतीनंतर मातेला स्तनपानासाठी आवश्यक असणारं दूध शेवग्याच्या सेवनाने वाढतं आणि गर्भाशयाला आलेलं जडत्व कमी होण्यास मदत होते. मासिक पाळी अनियमित असलेल्यांनी शेंगाचा ज्युस २१ दिवस प्यायल्याने पाळी नियमित होते. तसंच पाळीदरम्यानची पोटदुखीही थांबते. शेवगा अँटिबॅक्टेरिअल म्हणूनही काम करतो. त्यामुळे संसर्ग होण्याचा संभव कमी असतो. उत्तम पाचक म्हणून कार्य करते. बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवत नाही. नियमित सेवनाने त्वचेचा पोतही सुधारतो.


Monday 12 April 2021

अशी घ्या उन्हाळ्यात पोटाची काळजी


सध्या उकाडा प्रचंड वाढत चालला आहे. उन्हामुळे सर्वांनाच त्रास होतोय. त्यामुळेच अनेकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांमध्ये पोटाचे विकार सर्वाधिक दिसून येतात. बहुतांश लोक उन्हाळ्यात पोटदुखीच्या त्रासानं हैराण झालेले असतात. अशा वेळी उन्हाळ्यातील दिवसात पोटाशी संबंधित नेमके कोणकोणते त्रास होतात आणि त्याचा प्रतिबंध व उपचार कसा करावा, याबद्दल अधिक जाणून घेऊ या. उन्हाळा म्हणजे उकाडा. घाम, चिकटपणा आणि त्यासोबत येणारे वेगवेगळे आजार. सर्दी, खोकला आणि तापानंतर या दिवसांत सगळ्यात जास्त त्रास देतं ते म्हणजे पोट. उन्हाळ्याच्या काळावधीत उच्च तापमान व्यक्तीच्या मनावरच नव्हे तर शरीरावरही परिणाम करतं. उष्णतेमुळे व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होत जाते. त्यामुळे पोटासंबंधी विकार उद्भवू लागतात. पोटाचे आजार म्हणजेच पचनसंस्थेचे आजार. ते उन्हाळ्याच्या दिवसांत अधिक बळावतात. उन्हामुळे प्रचंड घाम येऊन शरीरातील पाणी निघून जात असल्यानं अनेकदा पोटविकार होतात. याशिवाय अस्वच्छ अन्न आणि दुषित पाण्यामुळे ही समस्या उद्भवते. याव्यतिरिक्त ताप येणं, वेदना जाणवणं, थकवा, अशक्तपणा, पोटदुखी आणि अगदी डोकेदुखीच्या तक्रारीही उन्हाळ्याच्या काळात दिसून येतात. उलट्या होणं, त्वचेवर लाल पुरळ उठणं,अॅसिडिटी, छातीत जळजळ होणं, चक्कर येणं, अशक्तपणा, महिलांमध्ये युरीन इन्फेक्शन, डायरिया  आणि ताप यासारख्या समस्याही उन्हाळ्यात आढळून येतात. उन्हाळ्यात अपचनाची समस्या टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी?

• पौष्टिक आहाराचं सेवन करा. फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.

• ताजी फळं, भाज्या, डाळी, सोयाबीन आणि शेंगदाणे खावेत.

•टोमॅटो, सफरचंद्र, नाशपती, टरबूज, काकडी, गोड बटाटे आणि अननस आहारात असू द्या.

• उष्णतेमुळे घामावाटे शरीरातील पाणी निघून जातं. म्हणून जास्तीत जास्त पाणी प्यावं. पाणी न प्यायल्यानं अतिसाराची समस्या उद्भवू शकते.

• मसालेदार, तळलेले आणि जंकफूडचे सेवन करणं टाळावं. यामुळे पोटात जळजळ होऊ शकते.

•पिझ्झा, चिप्स आणि बेकरी पदार्थ खाऊ नयेत.

• आतड्यामध्ये असणारे बॅक्टेरियासाठी प्रोबायोटिक्स अतिशय उपयुक्त ठरू शकतात.

• रस्त्याच्या बाजूला उघड्यावर असलेलं अन्न खाणं टाळा आणि शिळं अन्न खाऊ नका. कारण यामुळे विषबाधा होऊ शकते.

•दररोज व्यायाम करा. योग, पोहणे, सायकलिंग, धावणं आणि एरोबिक्स देखील करु शकता.

•नियमितपणे व्यायाम केल्यास आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होते. शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवून विविध आजारांना दूर ठेवता येऊ शकतं.


Friday 19 February 2021

सकाळी लवकर उठणे सर्वांसाठी फायदेशीर


अनेक यशस्वी लोकांना सकाळी उठून आपली कामे करण्यास पुरेसा वेळ मिळतो. ठरलेल्या नियोजन, कामाव्यतिरिक्त कामे करण्यासाठी त्यांना वेळ मिळतो. लवकर उठल्याने त्यांचे आरोग्य टिकून राहते. दवाखान्यात ढिगभर पैसे घालवण्याची वेळ त्यांच्यावर सहसा येत नाही. त्यामुळे लवकर उठून उत्साहाने, सकारात्मक विचारांनी कामाला सुरवात झाल्यास आपल्या कामात यश हमखास मिळते. सकाळी लवकर उठल्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात फ्रेश होते. उत्साह येतो. दिवसभर आपल्याला कोणती कोणती कामे करायची आहेत, हे पटकन सुचते. ती कामे पूर्णत्वास होण्यासाठी आपले प्रयत्न सुरू होतात. सकाळी लवकर उठून तुम्ही मॉर्निंग वॉक, जीम अथवा घरच्या घरी व्यायाम करू शकता. शुध्द हवेत ऑक्सिजन मुबलक प्रमाणात असल्यामुळे तुम्ही फ्रेश वातावरणात रनिंग (पळायला, चालायला) जाऊ शकता. घरी पूजा, प्रार्थना वेळेवर करता येतात. घरातील अन्य व्यक्तींना त्यांच्या कामात मदतही करू शकता. सकाळी उठून शांत वातावरणात अभ्यासही करता येतो. काही वेळा वेळ झाला म्हणून आपण नाष्ता करत नाही. न खाताच आपण बाहेर पडतो. पण, सकाळी नाष्ता खाणे, आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. काही जण जेवूनच बाहेर पडतात. अशावेळी नाष्ता किंवा जेवायला पुरेसा वेळ मिळतो. वेळेवर रेल्वे, बस मिळावी म्हणून पटपट कामे आवरून बाहेर पडू शकता. वेळेवर शाळा, कॉलेज, कामाला जाऊ शकता. मग, इथे तुमची धावपळ होणार नाही. अगदी पळापळ न करता, तुम्ही ही सर्व कामे आटोपशीर आणि व्यवस्थितपणे पार पाडू शकता. सकाळी लवकर उठून जर तुम्ही बाहेर फिरायला गेलात तर निसगार्चा आनंद तुम्हाला घेता येईल. सूर्योदय पाहणे, हे अनेकांना जमत नाही. पण, लवकर उठून गेल्यानंतर उगवता सूर्य पाहणे, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणे, एकांत आणि शांत वातावरणात चालणे, हे सर्व तुम्हाला तुमचे मानसिक आरोग्य जपायला कारणीभूत ठरते. चालल्याने, रनिंग, मेडिटेशन, व्यायाम केल्याने तुमचे आरोग्य सुधारते. तुम्ही फिट राहू शकता. जे लोक लठ्ठ आहेत, त्यांच्यासाठी तर लवकर उठून व्यायाम करणे, वॉकिंगला जाणे आवश्यक आहेत. शरिरातील अतिरिक्त चरबी करण्यासाठी हा सर्वात चांगला पर्याय आहे. काही जण मोकळ्या हवेत फिरतात, तर काही जण मैदान निवडतात, काहींना बागेत हिरव्यागार गवतावर अनवाणी चालायला आवडते. यामुळे तुम्ही मानसिक तणावापासून दूर राहू शकता. अनेक वेगवेगळ्या आयडिया तुम्हाला सूचतात. आत्मविश्‍वास वाढण्याबरोबरच स्फूर्ती येते. हा उत्साह रात्रीपर्यंत कायम टिकून राहतो.