Saturday 16 May 2020

रोजची दिनचर्या आणि रोग प्रतिकारशक्ती

आयुर्वेदातही रोगप्रतिकार शक्ती जास्त असणार्‍या लोकांच्या जवळ काही विकार फिरकतही नाहीत असे म्हटले आहे. आपली रोगप्रतिकार शक्ती जोपर्यंत चांगली असते तोपर्यंत आपण कोणत्याही विकारांचा सामना करण्यास सज्ज असतो. मात्र रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यास लहान-लहान आजारही उग्र रूप धारण करतात. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नुसती औषधे घेणे आवश्यक नाही तर आपली दिनचर्याही योग्य असायला हवी आणि आहारही. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही टिप्स पाहूया.

निरोगी आरोग्य
निरोगी आरोग्यासाठी सकाळी पौष्टिक नाश्ता करणे अतिशय आवश्यक आहे. शरीररूपी यंत्र दिवसभर सुरळीत चालण्यासाठी सकाळी नाश्ता करणे गरजेचे आहे. कारण याद्वारे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, ज्यामुळे दिवसभर काम करताना तुम्हाला थकावा जाणवत नाही. ज्यांना सकाळचा नाश्ता करणे शक्य नसते किंवा वजन कमी करण्याच्या नावाखाली जे नाश्ताच करणे टाळतात त्यांच्या शरीराला आवश्यक पोषकतत्त्वे मिळत नाहीत. फिट राहण्यासाठी प्रत्येक वयोगटातील लोकांनी नियमित पौष्टिक नाश्ता केला पाहिजे.

योग्य आहार
योग्य आहार आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचा आहे. वेळच्यावेळी सकस आणि पौष्टिक आहार घेतल्याने शरीराला आवश्यक पोषणद्रव्ये मिळतात. लिंबूवर्गीय (सी जीवनसत्व) फळांमध्ये रोगप्रतिकारक पेशी सक्षम करण्याची क्षमता जास्त असते. तसेच सुका मेवा, कडध्यान्य (ई जीवनसत्व) गाजर आणि रताळी (ए जीवनसत्व), यासह पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ, मासे, अंडी, खेकडे आणि शिंपले (बी जीवनसत्व) याच्या सेवनानेही रोगप्रतिकार शक्ती वाढते. कच्चा लसूण (ए आणि ई जीवनसत्व) रोगप्रतिकार शक्ती बुस्ट करतो आणि रोज जेवताना दही खाल्याने पाचनतंत्र ठीक राहते.तसेच सिजननुसार फलाहार घ्यावा.

पुरेशी झोप
झोपेत आपले शरीर शरीराला पूरक अशा हार्मोन्सची निर्मिती करत असते. झोपेच्या वेळांमध्ये बदल झाल्यास त्याचा थेट परिणाम रोगप्रतिकार शक्तीवर देखील होतो. शरीराची झीज भरून येण्यासाठी कमीतकमी सात ते आठ तास झोप आवश्यक असते. सात तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास शरीरात संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते आणि शरीर स्वत:ला प्रतिकारक्षम बनवण्यास असर्मथ ठरते. (साधारण किती काळ झोप आवश्यक आहे याबाबत ठाम सांगणे कोणालाही शक्य नाही मात्र निरोगी आरोग्यासाठी सात ते आठ तास झोप आवश्यक असल्याचे तज्ञ सांगतात)

नियमित व्यायाम  आणि योग करा
नियमित व्यायाम, योग केल्याने आणि शरीराला चालना दिल्याने रक्तप्रवाह सुधारतो. रोगप्रतिकारक पेशी आणि अन्य घटकांचा संचार वाढतो. नियमित व्यायाम आणि योगमुळे मन प्रसन्न राहते आणि शांत झोपही लागते. यासाठी रोज किमान ३0 मिनिटांचा व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच कपालभाती, अनुलोम-विलोम प्राणायम करावे.

ताण-तणाव टाळा
मानसिक, शारीरिक आणि सामाजिक ताणतणाव तुमच्या रोगप्रतिकार शक्तीवर घातक परिणाम करत असतात. दीर्घकाळ ताणतणावात राहिल्याने शरीरात हानिकारक हार्मोन्स तयार होतात. त्यामुळे रोगप्रतिकारक पेशी कमकुवत होतात आणि रोगप्रतिकार शक्ती ढासळते. ताणतणाव टाळण्यासाठी आनंदी रहा, योग-प्राणायम करा. दिवसातील किमान १५ ते २0 मिनिटं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आवडत्या व्यक्ती, मित्रमंडळी सोबत वेळ घालवा.
आनंदी रहा नेहमी आनंदी, उत्साही राहिल्याने ताणतणाव कमी होतो. तसेच यामुळे रोगप्रतिकारक पेशीचे योग्य संतुलन राखण्यास मदत होते.

No comments:

Post a Comment