Sunday 28 May 2023

स्मार्टफोन, टॅब अधिक वापराल, तर विकारांना निमंत्रण द्याल

 स्मार्टफोन, टॅब, आयपॉड, लॅपटॉप, संगणक, टीव्ही आदी विविध इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट (विद्युत उपकरणे) सध्या बहुतांश लोकांच्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक बनले आहेत. संवाद, कामाच्या दृष्टीने ही गॅझेट उपयोगी ठरत आहेत. मनोरंजनासाठीही वापर होत आहे. मात्र, या गॅझेटचा अधिक आणि अतिरेकी स्वरूपातील वापर हा विविध स्वरूपातील विकारांना निमंत्रण देणारा ठरत आहे. त्यात निद्रानाश, स्थूलपणा, चंचलपणा वाढणे, एकाग्रता कमी होणे, डोळ्यांत कोरडेपणा वाढणे आदींचा त्रास वाढत आहे. त्याने शारीरिक त्रास वाढण्यासह मानसिक स्वास्थ कमी होत आहे. ते टाळून चांगले जीवन जगण्यासाठी या गॅझेटचा कामापुरता आणि मर्यादित वापर करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 डॉक्टर सांगतात की,  इलेक्ट्रॉनिक गॅझेटमुळे आपल्यावर शारीरिक आणि मानसिक स्वरूपातील परिणाम होतो. त्यात मानसिकदृष्ट्या विचार करता अनामिक भीती वाटते. स्वभाव चिंताग्रस्त होतो. नैराश्याची भावना वाढते. विनाकारण चॅट करण्याची सवय लागते. त्यातून अनेक गैरसमज निर्माण होऊन मनावर ताण वाढतो. गॅझेट वापरताना तासन्‌तास बसून राहत असल्याने शारीरिक लठ्ठपणा वाढतो. सोशल मीडियावरील रिल्स, व्हिडिओ पाहताना सारखे स्क्रोल करावे लागते. त्याचा परिणाम रक्तदाब कमी-जास्त होण्यावर होतो. रक्तदाब, मधुमेहासारखा त्रास सुरू होतो. पाठदुखी, मानदुखी सुरू होते. ते टाळण्यासाठी या गॅझेटचा मर्यादित वापर करावा. स्मार्टफोनमधील फोकस मोडची, स्क्रीन टाईमची माहिती देणारे ॲप्स वापरावेत. किमान आठ तास झोप घ्यावी.

या गॅझेटमधून रेडिओ लहरी निघत असतात. त्यामुळे गॅझेटचा अधिक वापर झाल्यास या लहरींमुळे हळूहळू मेंदूवरील नियंत्रण कमी होऊ लागते. त्यातून मानसिक विकार निर्माण होतात. लहान मुलांबाबत सांगायचे झाले, तर त्यांच्या बौद्धिक क्षमता विकासाला ते मारक ठरते. स्क्रीन टाईम वाढल्याने मानसिक स्वरूपातील त्रासाचा सामना करावा लागतो. त्यात अभ्यास असो, की इतर कोणतेही काम त्यातील एकाग्रता कमी होते. चंचलपणा, विनाकारण चिडचिडेपणा अधिक वाढतो. स्वभावातील रागीटपणा वाढतो. या सर्वांचा मानसिक, शारीरिकदृष्‍ट्या विपरीत परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येकाने या गॅझेटचा कमी वापर करण्यावर भर द्यावा. स्वयंशिस्त लावून घ्यावी. 

डोळ्यांचा कोरडेपणा, डोकेदुखी वाढते. मोबाईल, टॅब, लॅपटॉप आदी गॅझेटमधील स्क्रीनचा प्रकाश अथवा किरणांचा डोळ्यांना अधिक त्रास होतो. अधिक वेळ ‘स्क्रीन’वर राहिल्यास त्याने डोळ्यांवर ताण आणि कोरडेपणा वाढतो. डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. लहान मुलांना लवकर चष्मा लागतो. स्क्रीन टाईमचा अतिरेक झाल्यास डोळे अशक्त होतात. डिजिटल व्हिजन सिंड्रोमचा त्रास सुरू होतो. त्याने डोळ्यांत वेदना होते. व्हिजन कमी होते. डोळे लाल होणे, अंधुक दिसणे, डोळ्यांतून पाणी येणे अशा स्वरूपातील त्रास होतो. ते टाळण्यासाठी सर्वांत पहिल्यांदा या गॅझेटचा मर्यादित वापर करावा.

काय काळजी घेतली पाहिजे?

स्क्रीन टाईम कमी करावा*अंधारात मोबाईलसह अन्य गॅझेटचा वापर करणे टाळावे. झोपण्यापूर्वी आणि सकाळी झोपेतून जागे झाल्यावर किमान तासभर मोबाईल पाहू नये. झोपताना किमान स्वतःपासून सात फूट लांब मोबाईल, गॅझेट ठेवावेत. काम करताना अथवा स्क्रीनवर असताना अँटी-रिफ्लेक्टिव्ह ग्लासेस किंवा स्क्रीन वापरा. या गॅझेटसाठी ब्ल्यू लाईट फिल्टरचा उपयोग करावा. संगणक ४५ अंश कमी कोनात ठेवावा. स्क्रीन टाईमदरम्यान आणि नंतर डोळ्यांना मॉश्चरायझिंग आय ड्रॉप्स वापरावेत. प्रत्येकाने सात ते आठ तास झोप घ्यावी, रोज दोन ते तीन लिटर पाणी प्यावे, सूर्यप्रकाशात वारंवार बाहेर जावे. योग्य आहार आणि नियमितपणे व्यायाम करावा, किमान रोज ४५ मिनिटे चालावे.