Wednesday, 28 April 2021

ड्रॅगन फ्रूटचे आरोग्यदायी फायदे


ड्रॅगन फ्रूटची शेती आपल्याकडे दुष्काळी भागात वाढत आहे. कमी पाण्यात तग धरून राहणारी ही वनस्पती चांगले उत्पन्न देत आहे. आकर्षक रंगाचे ड्रॅगन फ्रूट हे मूळचे मेक्सिको आणि अमेरिका या देशातील आहे. याचे फळ चांगले उत्पन्न देऊन शेतकऱ्याला त्याची आर्थिक उन्नती करण्यास हातभार लावत आहेच,पण हे फळ आरोग्य दृष्टीनेही मोठे लाभदायक आहे.  ड्रॅगन फ्रूटमध्ये प्रथिनांचे चांगले प्रमाण असते. शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासोबतच पचनक्रिया  सुरळीत ठेवण्यासाठीही मदत होते. ड्रॅगन  फ्रूटच्या जातींमध्ये विविधता आढळते. यामध्ये पांढऱ्या रंगाचे गर असलेले लाल रंगाचे फळ, लाल रंगाचे गर असलेले लाल रंगाचे फळ आणि पांढऱ्या रंगाचे गर असलेले पिवळ्या रंगाचे फळ असे प्रकार दिसतात.ही फळे आता मोठ्या प्रमाणात बाजारात दिसू लागली आहेत.

या फळामध्ये भरपूर प्रमाणात 'क' जीवनसत्वाबरोबर कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह, आणि जीवनसत्त्व-ब तसेच 90 टक्के पाणी असते. अल्प प्रमाणात 'क' जीवनसत्त्व असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. फळात भरपूर प्रमाणात तंतूमय घटक असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. शरीरात रक्तपुरवठा नीट होऊन सर्व इंद्रिये व्यवस्थित काम करतात. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तातील साखर कमी होते. कोलेस्टेरॉल कमी असल्याने हृदय विकाराचा धोका राहत नाही. यामध्ये बीटा कॅरोटीन असल्याने रक्तदाब, हृदय विकारावर मात करता येते.

ड्रॅगन फळामध्ये उपलब्ध असणारे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, ओमेगा-3 आणि ओमेगा-6 वाईट कोलेस्टेरॉलला वाढू देत नाही. यातील लोह रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते आणि अॅनिमिया होऊ देत नाही. फळाचा आहारात समावेश असल्यास संधिवाताच्या वेदना कमी होतात. दात व हाडे मजबूत होतात. फळांचे सेवन केले तर रोगप्रतिकार शक्ती वाढते. फळांमधील लायकोपेन विकर आणि 'क' जीवनसत्त्व असते. फळाच्या सालीमध्ये पॉलीफेनॉल असते. चेहऱ्यावरचे फोड, रुक्ष केस, केस गळणे, उन्हाने काळवंडून गेलेल्या त्वचेवर हे फळ उपयोगाचे आहे.

ड्रॅगन फ्रूटपासून जॅम, जेली आणि सरबत करता येत असल्याने फ्रूट प्रक्रियेला संधी आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment