Monday, 1 June 2020

गूळ आणि खोबरे

'हेल्दी घटक' आपल्या आजूबाजूलाच व आपल्या आहारात पूर्वकाळापासूनच आहेत. फक्त आपल्याला कधीकधी इतर गोष्टींच्या प्रभावामुळे त्यांचा विसर पडतो. असेच काहीसे नारळ व गुळाचे झालेय.'नारळ व गूळ'. साधारण, परंतु अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारळाच्या झाडाला आपण 'कल्पवृक्ष' म्हणतो. कारण झाडाचा प्रत्येक भाग मनुष्याच्या कामास येतो. शिवाय आपली धार्मिक, सांस्कृतिक व मंगलकार्ये नारळाशिवाय तर अपूर्णच आहेत. शुभ कार्याची सुरुवात नारळ वाढवून, तर एखाद्याला निरोप देतानाही नारळच दिला जातो. वजन वाढेल, कोलेस्ट्रेरॉल वाढेल या अपप्रचारामुळे नारळ अनेकांनी जेवणातून हद्दपार केल्याचे मी पाहिले आहे.
अर्थातच, अधिक प्रमाणात सेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम निश्चितच आहेत आणि हा नियम सर्वच पदार्थ व घटकांच्या बाबतीत लागू पडतो. योग्य प्रमाणात सेवन केल्यास कदाचित
आहारातून काहीच वर्ज्य करावे लागणार नाही. खोवऱ्यामुळे केस व त्वचेचा पोत सुधारतो, हृदयाचे व हाडांचे आरोग्य सुधारते, नारळाच्या पाण्यामुळे ऊर्जा मिळते. खोबऱ्यामध्ये मग्नेशिअम, लोह, कॉपर, सेलेनियमसारखी खनिजे, अँटीऑक्सिडंट, कर्बोदके व प्रोटीन असे महत्त्वाचे पोषक घटक आहेत. आजकाल सुदैवाने गुळाला बऱ्यापैकी चांगले दिवस आले आहेत! गुळ आणि खोबऱ्याचे पूर्वीपासूनच घट्ट नाते. प्रसाद असो वा आनंदाचा गोडवा द्विगुणित करायचा असो, गुळ-खोबरे हवेच. गुळामध्ये देखील खोबऱ्याप्रमाणे
मग्नेशिअम, लोह, कॉपर, सेलेनियम सारखी खनिजे,
अँटीऑक्सिडंट असे उपयुक्त घटक आहेत. गुळामुळे ऊर्जा मिळते, अशक्तपणा दूर होतो, हाडे बळकट होतात. सर्दीखोकल्यामध्ये उपयुक्त. तसेच स्त्रियांना मासिकपाळीच्या काळात येणारे पेटके व सतत होणाऱ्या मूड स्विंग' यांवर गुळामुळे आराम मिळतो. तर असे हे गुळ व खोबरे एकत्र आले तर केवळ पदार्थांचाच नाही, तर आरोग्याचाही गोडवा द्विगुणीत करतील, हे नक्की. गूळ आणि खोबऱ्याच्या वड्या,लाडू करून त्याचा आहारात उपयोग केल्यास चांगला उपयोग होईल.

No comments:

Post a Comment