अनेकजण नियमित व्यायाम करतात. शक्यतो जीम टाळत नाहीत. मात्र आजारपण, प्रवास किंवा इतर कामांमुळे अधूनमधून व्यायाम चुकतो. कितीही प्रयत्न केला तरी ३६५ दिवस व्यायाम करणं शक्य नसतं. मात्र आठवड्यातले एखाद-दोन दिवस व्यायाम चुकला तरी अनेकांना खूप वाईट वाटतं. आपलं वजन वाढेल की काय, सगळी मेहनत पाण्यात जाईल की काय असे विचार मनात येतात. पण अधूनमधून व्यायाम चुकविल्यामुळे शरीर बेढब होत नसतं हे लक्षात घ्यायला हवं.
तुम्ही तीव्र स्वरुपाचा व्यायाम करत असाल तर एखाद-दुसरा दिवस जीमला जाता आलं नाही तरी काळजी करू नका. ही विश्रांतीसुद्धा चांगली असते हे लक्षात ठेवा. एखाद्या दिवशी व्यायाम न केल्यामुळे तुमचं वजन वाढणार नाही. एखाद्या दिवसाची विश्रांती स्नायूंना आराम मिळवून देते. शिवाय त्यांची झीज भरून काढायलाही मदत होते. अर्थात कारणाशिवाय व्यायाम चुकवू नका.
व्यायाम थांबविल्यानंतर लगेच वजन वाढत नाही. तुम्ही नियमित व्यायाम करत असाल आणि आठवड्यातले पाच ते सहा दिवस जीमला जात असाल तर लगेच वजन वाढणार नाही. अगदी आठवडाभर ब्रेक घेतला तरी काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही तंदुरुस्तीची पातळी पुन्हा गाठू शकता.
विश्रांतीच्या काळात तीव्र स्वरुपाचा व्यायाम करणं शक्य नसेल किंवा जीमची सुविधा उपलब्ध नसेल तर चालणं, धावणं, दोरीच्या उड्या मारणं असे व्यायाम करून तुम्ही तुमचा फिटनेस टिकवून ठेवू शकता.
No comments:
Post a Comment