Wednesday 22 January 2020

योग्य तेच खा. शिडशिडीत रहा

सध्याचा जमाना वजन घटवणार्‍यांचा आहे. चित्रपटातील नायक-नायिका यांच्या नादाला लागून सध्याची तरुण पिढी स्लिम फिगरवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. पण आता अशा लोकांसाठी एक चांगली बातमी आली आहे. तथाकथित डाएटच्या नावाखाली जे उपाशी राहावे लागत आहे, ते बंद होण्याच्या मार्गावर आहे, असे म्हणायला हरकत नाही. नवीन संशोधनानुसार वजन घटवण्यासाठी पूर्णत: उपाशी राहाणे आवश्यक नसते. तर योग्य आहार आणि तो योग्य प्रमाणात घेतल्यास वजनावर नियंत्रण मिळवता येते.गेल्या काही वर्षात वजन घटवण्याच्या, स्लीम फिगर मिळवण्याच्या मागे विशेषत: तरुण पिढी लागली आहे. आणि याच प्रयत्नात सुदृढ व निरोगी शरीर या संकल्पनेच्या व्याख्या संपूर्णत: बदलून गेल्या आहेत.
युवती स्वत:ची त्वचा हाडांना चिटकवून देह अस्थिपंजर झाला तरच आपण स्लीम आणि फिट असे मानतात. तर दंडाची बेंडकुळी चित्रपटातील नायकांएवढी मोठी असेल अन पोटावर सिक्स /एट पॅक्ज ऍब्ज दिसत असतील तरच आपण वेल बिल्ट आहोत, असा समज सध्याच्या युवकांमध्ये झाला आहे. परंत्य या सर्वांच्या मागे लागून खर्‍या स्वास्थ्यापासून समाज दुरावत चालल्याचे दिसत आहे.काही दशकांपर्यत स्थिती ठीक होती.पण चित्रपट आणि इडियट बॉक्स उर्फ टीव्हीचे साम्राज्य पसरल्यावर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. समोर दिसणार्‍या अंधानुकरण करण्याच्या नादात खरे सुदृढ व सुगठीत शरीर हल्ली दुर्मीळ झाले आहे. आणि या सगळ्यांत महत्त्वाची भूमिका आपला आहार बजावतो हे लक्षात आल्यावर आहाराच्या पोषण मूल्यांबाबत जागरूकता जरा जास्तच वाढली आहे. कॅलरी कॉन्शन्स आहार ही सध्याची फॅशन बनली आहे. केवळ उकडलेल्या भाजी, ताजी फळे अन पाणी हाच आहार असणार्‍या (आणि हे सर्व मुलाखतींमध्ये अभिमानाने सांगणार्‍या) नायक- नायिकांच्या नादी लागून हेल्थ कॉन्शन्स असणार्‍यांनी आहारावर जे काही प्रयोग केले ते मागे पडून आता पुन्हा खरोखर सकस आहार मान्यता मिळवू लागला आहे.
 विविध ठिकाणी झालेल्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, ज्या पद्धतीचा आहार आपली आपली आजी घेत असे, किंवा त्या पिढीतील लोक घेत असत तोच आहार श्रेष्ठ आहे. जरी काळ बदलला असला किंवा जीवनशैली बदलली असली तरी वरण-भात, भाजी-पोळी हाच आहार श्रेष्ठ आहार आहे, हे संशोधकांनाही मान्य झाले आहे. एवढेच नाही तर ज्या भागात जो पदार्थ विशेषत्वाने केला जातो तोच आणि  त्याच भागात खाल्ला जावा, असेही सिद्ध झाले आहे. म्हणजेच किनारपट्टीला निर्माण होणार्‍या फळांपासून, धान्यांपासून तयार केले जाणारे पदार्थ त्याच भागातील लोकांना व त्याच भागात हितकर असतात. कोकणात भात-मासे खाल्ले जातात, असे आपण पुस्तकांतून मुलांना सांगतो, ते खरेच आहे, हितकर आहे. इडली-डोसा पंजाबातल्या लोकांनी जास्त खाणे हितकर नाही. त्यांनी आलू-पराटा, डाल-रोटीवरच ताव मारायला हवा. केरळातल्या लोकांना पुरण-पोळी चालणार नाही. कारण भौगोलिक परिस्थितीचा  व वातावरणाचा उत्पादित होणार्‍या धान्यादींबरोबरच माणसांवरही सारखाच परिणाम होत असतो. शिवाय वजन वाढेल म्हणून जेवणातून हद्दपार झालेल्या तूप, लोणी इत्यादी पदार्थांना पुन्हा जेवणात समाविष्ट करण्यात आले आहे. काजू-बदामबरोबरच शेंगदाण्यालाही आता मान दिला जात आहे. कोलोस्टेरॉलच्या विरुद्ध ऑलिव्ह ऑईलचा वापर वाढत आहे.

 वजन कमी करण्याचे काम आपण जो आहार खातो तोच करत असतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी न खाणे हा उपाय नसून शरीराचे पोषण करूनही जो आहार वजन वाधू देत नाही, असा आहार घेणे हा आहे.हे शास्त्रीयदृष्टीने शिद्ध झाल्याने आता पुन्हा जुन्या गोष्टी याच शास्त्रीय बैठक असणार्‍या होत्या व त्यांचा स्वीकार करणे एकंदरीतच सर्वार्थाने हिताचे आहे, हे पुन्हा एकदा लक्षात आले आहे. आणि दिवसेदिवस विज्ञानाकडून जुने ते सोने या उक्तीला सार्थ ठरविणारे शोध लावले जात आहेत.

No comments:

Post a Comment