Thursday 23 January 2020

पाणी पिण्याचे फायदे

महाराष्ट्र शासनाने पाणी पिण्यासाठी खास बेल वाजवण्याची व्यवस्था केली आहे आणि तसे आदेशही दिले आहेत. त्यामुळे राज्यातल्या शाळांमध्ये आता दर दोन तासांनी मुलांना पाणी प्यायची आठवण होण्यासाठी व पाणी पिण्यासाठी बेल वाजवली जात आहे. या नियमांचे काटेकोर पणे अंमलबजावणी होते की नाही माहीत नाही,पण यातून थोड्या थोड्या अंतराने पाणी पिणे आवश्यक आहे,हेच यातून अधोरेखित होते. दिवसभरात आवश्यक त्या प्रमाणात पाणी पिणं आरोग्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं ठरतं, असं कितीही सांगितलं तरी त्याकडे बर्‍याचदा दुर्लक्ष केलं जातं आणि त्यातून विविध व्याधींचा सामना करावा लागतो.  भरपूर पाणी पिण्याचे फायदे अनेक आहेत.

मुख्यत्वे दिवसभरात ३ ते ३.५0 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. त्यातही कोमट पाणी पिणं फायद्याचं आहे. सकाळी अनोशापोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिण्याने लाभ होतो. रक्ताभिसरण व्यवस्थित होतं. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. आळस कमी होतो. त्वचेच्या समस्याही निर्माण होत नाहीत. त्याच बरोबर तारुण्य टिकून राहतं. आणखी महत्त्वाचा लाभ म्हणजे पुरेसं पाणी प्यायल्यानं शरीर आतून स्वच्छ होतं. किडनी स्टोन होत नाहीत. तसंच अन्नपचन चांगलं होतं. मेंदूला योग्य प्रकारे रक्त पुरवठा होतो.
सर्वसाधारणपणे जेवणानंतर ३0 ते ४५ मिनिटांनी आवश्यक तेवढं पाणी प्यावं. फ्रिजचं पाणी, बर्फाचे थंड पाणी पिणं टाळायला हवं. त्याऐवजी माठातील पाणी लाभदायक ठरतं. तहान लागली की पाणी प्यावंच. परंतु जास्त तहान लागल्यास गुळ-पाणी प्यावं. रात्री जास्त पाणी पिऊ नये. तसंच पाणी नेहमी बसूनच प्यावे. अन्यथा उतारवयात गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. पाणी चवीचवीनं म्हणजे तोंडात जास्त वेळ फिरवून पणं. त्यामुळे पाण्यात लाळ मिसळून पोटात जाते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

No comments:

Post a Comment