Tuesday, 28 January 2020

नकारात्मक विचार टाळा

सध्याच्या धावपळीत सतत काही ना काही समस्या येत असतात. त्यामुळे माणूस सतत तणावाखाली असतो. या तणावात माणसाच्या मनात एक प्रकारची भीती उद्भवते. या भीतीतून नकारात्मक विचार यायला लागतात. पण हे नकारात्मक विचार आपल्याला आणखीणच तणावाच्या खाईत लोटतात. त्यातून मनात सातत्याने येणारे नकारात्मक विचार आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर विपरीत परिणाम घडवून आणतात. हे टाळण्यासाठी आपल्याला सातत्याने सकारात्मक विचारांचा पाठलाग करायला हवा आहे. यासाठी काही गोष्टी करणे भाग आहे.

मनात येणारे विचार लिहून काढण्याची सवय ठेवली तर नकारात्मक परिस्थिती आणि विचारांचा सामना करण्याचं बळ मिळेल. महत्त्वाचे म्हणजे आपण आपले शारीरिक आरोग्य जपायला हवे.  शारीरिक आरोग्य उत्तम असलं की मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. तुमच्या दिनक्रमात व्यायामाला स्थान द्या. आरोग्यदायी, पोषक पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे मानसिक आरोग्यही सुधारेल. नैराश्य आणि नकारात्मकतेचा सामना करणं शक्य नसेल तर तज्ज्ञमंडळींची मदत घ्या. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे नैराश्याची समस्या दूर होऊ शकते तसंच झोप न येणं, थकवा यासारख्या समस्यांचा सामना करणं शक्य होतं.
    नैराश्य आणि ताणामुळे तुम्ही अस्वस्थ होता, थकवा येतो. त्यामुळे दिवसातला काही काळ स्वत:साठी ठेवा. आठवड्यातून एकदा स्पामध्ये जा. गाणी ऐका. डान्स करा. आवडीचं काहीही करा. झोपण्याआधी हॉट चॉकलेट किंवा गरमागरम कॉफीही घेता येईल. यामुळे तुम्ही रिलॅक्स व्हाल. तुमच्या विचारांचा सामना करायला शिका. विचार दूर घालवण्याचा किंवा त्यापासून पळण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे अशा विचारांची भीती वाटणार नाही. अशा विचारांचा फार प्रभावही पडणार नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

No comments:

Post a Comment