Monday 20 January 2020

शांत झोप हेच खरे डिप्रेशनवरचे औषध

रात्री जर शांत झोप झाली नाही तर त्यामुळे नैराश्य तीस टक्क्यांनी वाढते. जर रात्रीची झोप व्यवस्थित असेल तर तुमच्या भावनाही स्थिर राहतात, असे नैराश्यावरील संशोधनात दिसून आले आहे. नैराश्यावर औषधांचा वापर न करता उपाय करण्यावर भर देण्यात येत आहे. 'नेचर हय़ूमन बिहेवियर' या नियतकालिकातील शोधनिबंधात म्हटले आहे, की ज्यांचे मानसिक आरोग्य बिघडलेले आहे त्यांच्यात नैराश्य, चिंता ही खरी कारणे असतात. काही वेळा या लोकांमध्ये भीतीची भावनाही बळावलेली असते. पण याचे मूळ कारण त्यांची झोप शांत नसणे हे आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे,की नॉन रॅपिड आय मुव्हमेंट म्हणजे एनआरइएम प्रकारची झोप शांत असेल तर मेंदू शांत होतो. या झोपेच्या अवस्थेत मेंदूतील न्यूरॉन्सची विद्युत कृतिशीलता ही अतिशय सुसंवादी असते.
हृदयाचे ठोके व रक्तदाब यात कमी होत असतो. यात मेंदूतील जोडण्यांची फेरजुळणी होऊन झोप शांत लागते व नैराश्य कमी होते. मेंदूतील जोडण्या व झोप तसेच नैराश्य यांचा एकमेकांशी संबंध आहे.
संशोधकांच्या मते शांत झोपेने नैराश्य व मानसिक ताणही कमी होतो. अठरा जणांच्या मेंदूचे एमआरआय, पॉलीसोनोग्राफी चित्रण केले असता त्यात शांत झोप झालेले लोक व शांत झोप नसलेले लोक यांच्या चित्रणात फरक दिसून आला. ज्यांची झोप नीट झाली त्यांच्यात मेडियल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स या भागातील क्रियाशीलता बंद झाली.
या भागातील कृतिशीलता ही नैराश्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करीत असते. तर, झोप नसेल तर मेंदूतील भावना केंद्रे ही जास्त क्रियाशील होतात व त्यामुळे मन अस्वस्थ होते. यात सहभागी वैज्ञानिक सिमॉन यांनी दिलेल्या माहितीनुसार संशोधनात सहभागी तीस जणांच्या अभ्यासात ज्यांची रात्रीची झोप शांत होती त्यांच्यात नैराश्याचे प्रमाण कमी होते. यात २८0 जणांचा अभ्यास ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला. त्यातही, ज्यांची रात्रीची झोप शांत होती त्यांच्यात नैराश्याचे प्रमाण दुसर्‍या दिवशी कमी होते.

No comments:

Post a Comment