जसजसं वय वाढत जातं, तसतशी शरिरात कॅल्शियम निर्मितीची प्रक्रिया मंदावते. परिणामी एखादं हाड फॅक्चर झालं, तरी मग ते भरुन येण्यास वेळ लागतो. त्यामुळे उतारवयात अधिक काळजी घ्यावी लागते. वयोवृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिकांमधील विकलांगता आणि आजाराचे प्रमुख कारण म्हणजे हे लोक खूपच अशक्त झालेले असतात.या अशक्तपणाचे मुख्य कारण बऱ्याचदा कुपोषण किंवा पोषक आहाराची कमतरता हे असते. अशावेळी या लोकांना पुरेसा योग्य आहार आणि पूरके दिली गेली तर अशक्तपणाचा धोका कमी होतो.
हेल्थ सप्लिमेंट हा प्रामुख्याने प्रथिनांनी युक्त असा पर्यायी आहार असतो. ज्या रुग्णांना दूध पचत नाही किंवा पुरेशी प्रथिने अन्नातून मिळत नाहीत अशांना आरोग्यवर्धक आहार म्हणून प्रोटिन हेल्थ सप्लिमेंट दिल्या जातात. परंतु हेल्थ सप्लिमेंट घ्यायच्या झाल्यास त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्यात. शाकाहारी लोकांच्या शरीरातील प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी प्रोटिन सप्लिमेंट हा चांगला पर्याय असतो. सर्वसाधारणपणे ज्या शाकाहारी पदार्थांमध्ये प्रथिने असतात त्या पदार्थांमध्ये अमिनो अॅसिड अभावानेच आढळते. म्हणून अशा लोकांसाठी प्रोटिन हेल्थ सप्लिमेंट घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
याशिवाय शरीरातील लोह, कॅल्शियम कधी तर जीवनसत्त्व काही कारणाने कमी झाली असतील तर ती कमतरता भरून काढण्यासाठीही हेल्थ सप्लिमेंटचा पर्याय सुचवला जातो.आहारातील प्रथिनांचे प्रमाण वाढल्यास हाडांचे आरोग्य सुधारते. प्रथिनांचा आहारात समावेश करणे, त्यासोबतच कॅल्शिअम आणि 'डी' जीवनसत्त्वाचाही समावेश करणे सुचवलं जातं. वयोवृद्धांच्या हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम पूरके दिली जातात व त्याला 'डी' जीवनसत्त्वाची जोड दिली जाते. कॅल्शिअम आणि 'डी' जीवनसत्त्वाची पूरके घेतल्यास हाडं मोडण्याचा धोका कमी होतो. परंतु केवळ कॅल्शिअम पूरके घेणे पुरेसे ठरत नाही.
कॅल्शिअम आणि 'डी'जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा धोका असलेल्या रुग्णांना 'डी' जीवनसत्त्वांची पूरके दिली जातात. वयोवृद्धांमध्ये 'डी' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे स्मृती संदर्भातील विकार होण्याची शक्यता असते. म्हणूनच तिचा प्रतिकार करण्यासाठी किंवा मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी शरीरात 'डी' जीवनसत्त्वाची पातळी उच्च राखणं महत्वाचं असतं. हायड्रोक्सिव्हिटॅमिन 'डी'ची पातळी घटल्यास मृत्यूचा धोकाही संभवू शकतो. म्हणून काही वेळेस वृद्धांना जीवनसत्त्व 'डी-थ्री'ची पूरके दिली जातात व त्याने चांगला गुण येतो असे दिसून आले आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ही पुरके घ्यावीत व त्यांच्या सूचनेनुसार घरातील वृद्ध व्यक्ती ती घेत आहेत याची खात्री करून घ्यावी.
No comments:
Post a Comment