Saturday, 6 June 2020

पावसाळा आणि संसर्गजन्य साथीचे आजार

पावसाळ्यात डबकी साठल्याने त्यात अॅनाफेलिस डासांची पैदास होऊन त्यांच्या दंशामार्फत मलेरिया पसरतो. पावसाळ्यात घरांमध्ये, घरातल्या कुंड्यांमध्ये किंवा टेरेसवर ठेवलेल्या निरुपयोगी वस्तूंमध्ये किंवा रस्त्यावर फेकलेल्या टायरमध्ये स्वच्छ पाणी साठल्यास त्यात एडीस इजिप्ती डास निर्माण होतात. त्यांच्याद्वारे डेंगीचा आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव होतो. घरात, छपरावर, आपल्या आजूबाजूस स्वच्छ पाणी साचू न देणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
जी गोष्ट डासांची तीच माश्यांची. वैयक्तिकरीत्या आणि सार्वजनिक पातळीवर स्वच्छता न राखल्याने माश्या निर्माण होतात. त्यांच्यापासून रोगांचा प्रसार होतो. उलट्या-जुलाब, कॉलरा, कावीळ, टायफॉईड अशा विविध रोगांना आम जनता बळी पडते.

लेप्टोस्पायरोसिस
लेप्टोस्पायरोसिस हा आजार 'लेप्टोस्पायरा' प्रजातीच्या जिवाणूंमुळे होतो. पावसाळ्यात हा आजार होण्याचे प्रमाण जास्त दिसते. या आजाराचे जिवाणू मानवी शरीरात थेट शिरत नाहीत, तर म्हैस, घोडा, बकरी, उंदीर, कुत्रा अशा प्राण्यांच्या मूत्राद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतात. या प्राण्यांना या जिवाणूंपासून कोणताही त्रास होत नाही. ते त्यांच्या शरीरात
अनिर्बंधपणे वाढतात आणि त्यांच्या मूत्रातून हे जिवाणू त्यांच्या शरीराबाहेर पडतात. या मूत्राचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या माणसांच्या शरीराशी संपर्क आल्यास हा आजार संपर्क येणाऱ्या माणसांना होतो. पावसाळ्यात आलेल्या पुरामध्ये किंवा रस्त्यावरून वाहणाऱ्या पाणलोटामध्ये या प्राण्यांचे मूत्र मिसळून हे जंतू पसरतात. विशेषतः गोट्यांमध्ये पाणी शिरून तिथले मूत्र या पाण्यात पसरते.
मुंबईमध्ये पावसाळ्यात जमिनीखालची गटारे तुंबून त्यातील पाणी रस्त्यावरून वाहू लागते. यात त्या गटारातील लेप्टोस्पायरा जंतूंची लागण झालेल्या उंदरांचे मूत्र विरघळून पसरते आणि हा आजार त्या पाण्यातून चालणाऱ्या माणसांना होतो. या आजाराची बाधा प्रामुख्याने पूरग्रस्त भागात किंवा शेती करणाऱ्या लोकांना पटकन होते.
हा आजार तसा साधा वाटतो. या आजाराचे निदान वेळेवर न झाल्यास आणि त्यामुळे योग्य तो इलाज न झाल्यास, रुग्णांची मूत्रपिंडे निकामी होऊ शकतात.
मेंदूच्या आवरणांना सूज येऊन मेनिनजायटीस हा गंभीर आजार होतो. यामध्ये रुग्ण मृत्युमुखी पडण्याची दाट शक्यता असते.

No comments:

Post a Comment