Friday, 5 June 2020

पावसाळा आणि श्वसन विकार

पावसाळ्यात आरोग्याच्या तक्रारी खूप उद्धवतात, पण त्यासाठी आपणच जबाबदार असतो. आपण विशेष खबरदारी घेत नाही, म्हणून हे आजार आपल्याला होतात. तसे पाहिले, तर हिवाळ्यातली थंडी सर्वत्र पसरते, अगदी दारे खिडक्या बंद केलेल्या घरातही. त्या थंडीच्या परिणामाने आपल्या तब्येतीवर परिणाम होतात, तिच गोष्ट उन्हाळ्यात घडते. आपण घरात बसूनही उष्णतेच्या झळा आपल्याला छळत राहतात. उन्हाळ्यात होणारे डीहायड्रेशन आपल्याला चार भिंतीत राहूनही त्रास देते; पण पावसाळ्याचे तसे नाही. प्रतिबंधक उपाय न केल्याने पावसाळ्यात निरनिराळे आजार उफाळून येतात.

श्वसनसंस्थेचे आजार
पावसात तुम्ही अनिबंध भिजलात, अंग कोरडे केले नाही. डोके दीर्घकाळ ओले ठेवले, तर शिंका येतात. सदी होते. सर्दी होणे आणि शिंका येणे हा तसा आजार नसतो. आपल्या शरीराला पाण्यात दीर्घकाळ ओले राहिल्याने जो गारवा येतो, त्याला शरीराचा हा प्रतिबंधात्मक उपाय असतो.

ही काळजी घ्या : पावसात जाताना छत्री, रेनकोट वापरलात किंवा पावसात भिजून आल्यावर अंग लगेच कोरडे केले आणि गरम गरम चहाकॉफी घेतलीत, तर काहीही त्रास होत नाही. त्यात युगानुयुगे चालत आलेला गवती चहा घेतलात तर उत्तमच. सर्दीची काळजी घेतली, तर खोकलाही होणार नाही. जर पावसाच्या ओल्या गारठ्याने घशात खवखव झाली, खोकल्याची उबळ येऊ लागली, तर कोमट पाण्याच्या गुळण्या दिवसातून चार-पाच वेळा करत राहिलात, तर हा खोकलाही पळून जातो. किरकोळ गरजेपुरते औषध घेऊ शकता. पावसाळ्यात श्वसनसंस्थेवर आक्रमण करणाऱ्या व्हायरसची म्हणजे विषाणूंची आणि बहुविध जातींच्या जिवाणूंची फौज तयार असते. पावसाळ्यात सर्दी झाली आणि ती कमी व्हायला वर सांगितल्याप्रमाणे योग्य उपाय केले नाहीत, तर ते जंतू नाकातून घशात जातात. त्यात मग टॉन्सिल्स सुजतात, घसाही सुजतो. या टप्प्यावर तेव्हाही फिकीर केली नाही, तर ते जंतू श्वासनलिकेत आणि तिथून पुढे फुफ्फुसात जातात. याचा परिणाम म्हणून दीर्घकाळ राहणाऱ्या खोकल्याचे आजार म्हणजे ब्रॉन्कायटिस, न्यूमोनिया असे आजार उद्भवतात. या आजारांमध्ये मात्र डॉक्टरांकडून तपासून घेऊन योग्य ती औषधे लगेच सुरू करावी लागतात. या आजारात योग्य ती औषधे घेण्यात कुचराई केली, तर श्वासनलिका सतत सुजून त्यांचे आकुंचन प्रसरण होत नाही, त्यात अडथळे निर्माण होतात. फुफ्फुसातले वायुकोष कमी होत जातात आणि क्रॉनिक ब्रॉन्कायटीस, सीओपीडी, ब्रॉन्किओलायटिस, एम्फायझिमा असे आजार व्हायला वेळ लागत नाहीत. हे आजार पावसाळी हवेत वेगाने निर्माण होतात; पण त्यामागे पावसाळा नव्हे, तर ते आजार छोट्या स्वरूपात असताना वेळेवर औषधे न घेणे, अतिरिक्त धूम्रपान करणे, विषारी वायूंच्या कारखान्यात काम करणे अशी कारणे असतात.

No comments:

Post a Comment