Sunday 14 June 2020

आला पावसाळा,तब्येत सांभाळा

उन्हाने अंगाची लाही लाही होत असतानाच आकाशात
ढगांनी गर्दी केली. अचानक पावसाच्या धारा बरसू लागल्या. अशा हवामान बदलाचा परिणाम थेट आरोग्यावर होतो. अशा वेळी तब्येतीची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण सर्वाधिक असते. म्हणून वापरातील सर्व पाण्यावर किमान तुरटी फिरवून ते वापरावे. अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांच्यासारखे जलजन्य आजार हे या दिवसांत अधिक पसरतात. लहान मुलांना त्याची लगेचच बाधा होते. पावसाळ्यामध्ये संसर्गाची भीती अधिक असते. पाण्याच्या शुद्धतेबरोबर अन्य कारणांमुळेही हा प्रादुर्भाव होत असला तरीही रोगराई झपाट्याने पसरू नये, यासाठी स्वच्छता ठेवणे मुख्य प्रतिबंधक उपाय आहे.

पावसाळ्यातील काळजी...
• आपले घर, परिसर स्वच्छ ठेवा. घरात ओला व सुका
कचरा वेगळा ठेवा.
• भांडी, कपडे ओलसर ठेवू नका. स्वयंपाक करण्याची
जागा स्वच्छ व निर्जंतुक साबणाने स्वच्छ करून घ्यावी.
• लहान मुलांची खेळणी आठवड्यातून एकदा निर्जंतुक पाण्यातून विसळून घ्यावीत.
• पावसाळ्यातील हे आजार टाळण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून व गाळून पिणे आवश्यक आहे.
• घराच्या भोवती कुंड्या लावल्या असतील, तर
पावसाळ्यापुर्वी त्याची छाटणी करावी.
• घरामध्ये झाडे लावू नयेत. यात पाणी साठून डासांची
पैदास वाढते.
• जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
• उघड्यावरील अन्न पदार्थ आणि शिळे अन्नपदार्थ खाऊ नयेत.
• कोणतेही इन्फेक्शन होऊ नये म्हणून मास्क वापरावा.
• ज्येष्ठ नागरिकांनी उबदार कपडे वापरावेत. कानटोपी
घालावी.
• तेलकट, तूपकट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
पावसाळ्यातील आजाराची लक्षणे
• सतत उलट्या होणे, जुलाब होणे, ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, गळून गेल्यासारखे वाटणे.
• स्त्रियांमध्ये हात-पाय खूप दुखणे, मुलांमध्ये पोट
दुखण्याचा त्रास जाणवतो.
वातावरणात बदलामुळे सदा, ताप, खोकला हे सिझनल आजार होण्याची शक्यता असते. या आजाराचे विषाणू
हवेव्दारे पसरत असल्याने मास्क वापरणे फायदेशीर ठरेल. ताजा व हलका आहार घेण्यावर भर द्यावा.

No comments:

Post a Comment