Tuesday, 9 June 2020

काकडी खाण्याचे फायदे

काकडीमधील कमी कॅलरीजमुळे डाएटमध्ये याचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो. काकडीमध्ये पाण्याची मात्रा आणि फायबर अधिक असल्याने वजन कमी करण्यात काकडी उपयोगी ठरते. मध्यम आकाराच्या काकडीपासून केवळ २५ कॅलरीज मिळत असल्याने आहारात सेवन करून किशोरवयातील मुलांना वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवणे सहज सोपे होते. महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीत तर काकडीचे अनेक खाद्यप्रकार आढळतात. जसं कोशिंबीर, सॅलड, काकडीचे थालीपीठ, चटणी किंवा कढीमध्ये काकडी, घावन. अगदी रोजच्या नाश्त्यातील सँडविचमध्ये आपण आवर्जून काकडी वापरतो.

आपल्या शरीरातील हानिकारक मुक्त कणांच्या संचयामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. काकडी ही अँटीऑक्सीडंट्सयुक्त आहे. जी असे आजार होण्याची शक्यता कमी करते. काकडीमध्ये फायबर आणि पाणी असल्याने पचन सुलभ होऊन बद्धकोष्ठता कमी होते.
काकडीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी असल्याने चिंता निर्माण करणाऱ्या भावना कमी करून तणावाचे परिणाम दूर करण्यास मदत होते. पाणी आपल्या शरीरातील सर्व कार्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. जसे शरीराचे तापमान नियंत्रित करणे आणि पोषक तत्त्वांचे उत्पादन शोषणे आणि वहन करून शरीरातील अन्य अवयवांकडे पोहोचविण्याचे कार्य केवळ पाण्यामुळे शक्य होते.
शरीरातील योग्य हायड्रेशनमुळे शरीर निरोगी राहते आणि चयापचय क्रिया सुरळीत राहते. फळे आणि भाज्या यामध्ये भरपूर पाण्याचा अंश असून काकडी ही मुख्यतः हायड्रेशनमध्ये विशेष प्रभावी आहे. कारण काकडीमध्ये ९६ टक्के पाणी आढळते.
उन्हाळ्याच्या दिवसात शरीराची पाण्याची गरज वाढते तसेच सन बर्न किंवा उष्णतेचा त्रास होत असल्यास काकडीचा रस काढून त्यात लिंबाचा रस, साखर, मीठ आणि भिजवलेला सब्जा एकत्र करून घेतल्यास फायदा होतो. उष्णतारोधक काकडी तुमच्या त्वचेसाठी सर्वोत्तम नैसर्गिक उपाय आहे. काकडीच्या वापराने डोळ्याखालील काळी वर्तुळ कमी करता येतात.
यामध्ये असणाऱ्या अँटी ऑक्सिडण्ट्स आणि सिली या घटकांमुळे डोळ्यांखालील वर्तुळं कमी होतात. तसंच तुमच्या डोळ्यांतील उष्णता शोषली जाऊन डोळ्यांना थंडावाही मिळतो. कडक उन्हात जाऊन आल्यामुळे फ्रेकल्स म्हणजेच चट्टे त्वचेवर उठतात. काकडीने हे चट्टे कमी करण्यास मदत होते.

No comments:

Post a Comment