Tuesday 20 April 2021

शेवग्याचे सेवन आरोग्याला हितकारक


आपल्या खाद्यसंस्कृतीत शेवग्याला विशिष्ट असे स्थान आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीला शेवग्याच्या पानांची भाजी आवर्जून केली जाते. शेवग्याच्या फुलांची भाजी, शेवग्याच्या शेंगांची भाजी, शेवग्याच्या शेंगांचे सार, शेंगा, फ्राय, लोणचे तयार करता येते. ओरिसामध्ये शेवग्याच्या शेंगा वापरून छुई आळू पोटळं भजा ही परतलेली कोरडी भाजी बनविली जाते. उडप्यांच्या हॉटेलातील सांबारात शेवग्याच्या शेंगेला विशिष्ट स्थान आहे.. शेवगा गरम, हलका, मधुर, तिखट, अग्निप्रदीपक, रुचकर, दाहकारक, वीर्यवर्धक, पित्त वरक्त प्रकोपक असून, शेवग्याची भाजी वातविकार दूर करणारी आहे. शेवग्याच्या मुळांचा रस काढून किंवा त्याच्या काढ्यात मध घालून घेतल्याने गळू बरे होतात. शेवग्याच्या खोडातून एक भुया रंगाचा डिंक मिळतो. तसेच बियांमधून रंगरहित तेल मिळते. तसेच मोठया प्रमाणात खनिजे आढळतात. शेवग्यापासून जीवनसत्त्व अ, क तसेच ई तयार करतात. पाणी शुद्धीकरणात शेवग्याच्या बियांचा वापर होतो. शेवग्याच्या पानांचा रस प्यायल्याने उचकी थांबते व धाप लागणे कमी होते. शेवग्याच्या पानांच्या रसात चमचाभर साखर घेऊन तो तीन दिवस प्यायल्याने वायूने आलेला गोळा नाहीसा होतो. शेवग्याच्या पानांच्या रसाने डोके चोळले असता डोक्यातील कोंडा निघून जातो.

मस्तकशूळ झाला असल्यास शेवग्याच्या पानांच्या रसात मिरे वाटून त्याचा लेप लावावा. पोट फुगले असल्यास शेवग्याच्या पानांच्या रसाचा काढा तयार करून त्यात हिंग व सुंठ घालून तो प्यावा. वाळलेल्या शेवग्याच्या शेंगांचं चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरलं जातं. तोंड येण्याची समस्या सतावत असलेल्यांनी याच्या पानांचा आहारात समावेश करावा. यात कॅल्शिअम, लोह आणि इतर जीवनसत्त्वांचा भरपूर प्रमाणात साठा असतो. त्यामुळे हाडांची मजबुती राखण्यास मदत होते. शेवग्याचा रस नियमित आहारात घेतल्यास हाडं मजबूत होतात.

रक्तशुद्धीकरण होऊन त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते. रक्तातील साखरेची पातळी कमी करत असल्याने मधुमेही रुग्णांनी शेवग्याचं सेवन करणं आवश्यक आहे. घसा खवखवणे, घसा सुजणे किंवा सर्दी झालेल्या लोकांनी या भाजीचं सूप प्यावं म्हणजे लवकर आराम पडतो. अस्थमा, ब्राँकायटिस आणि क्षयरोग असलेल्या लोकांनी ही भाजी खावी, म्हणजे त्रास कमी होतो. गरोदर महिलांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं, जेणेकरून प्रसुतीपूर्व आणि नंतर होणारे त्रास कमी होतात. तसंच प्रसूतीनंतर मातेला स्तनपानासाठी आवश्यक असणारं दूध शेवग्याच्या सेवनाने वाढतं आणि गर्भाशयाला आलेलं जडत्व कमी होण्यास मदत होते. मासिक पाळी अनियमित असलेल्यांनी शेंगाचा ज्युस २१ दिवस प्यायल्याने पाळी नियमित होते. तसंच पाळीदरम्यानची पोटदुखीही थांबते. शेवगा अँटिबॅक्टेरिअल म्हणूनही काम करतो. त्यामुळे संसर्ग होण्याचा संभव कमी असतो. उत्तम पाचक म्हणून कार्य करते. बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवत नाही. नियमित सेवनाने त्वचेचा पोतही सुधारतो.


No comments:

Post a Comment