Sunday 2 May 2021

पोषण घटकांचे भांडार :अळू


चटकमटक खाण्याची सवय असलेली माणसं अळू, मेथी,शेपू अशा भाज्यांकडे पाहून तोंड वेंगाडतात. मात्र, अशा अनेक भाज्यांमध्ये शरीराला आरोग्य प्रदान करणारे अनेक पोषक घटक असतात हे विसरले जाते. तज्ज्ञांनी म्हटले आहे की शरीरातील पोषक घटकांची कमतरता दूर करण्यासाठी अळूसारख्या भाज्या अत्यंत लाभदायक आहेत. अळूमध्ये पोषक घटकांचे भांडारच असते. अळू हे कार्बोहायड्रेटस् आणि प्रोटिनचे उत्तम स्रोत असते. अळूच्या कंदामध्ये बटाटा किंवा रताळ्यापेक्षाही अधिक स्टार्च असते. अळूच्या पानांमध्ये 'अ' जीवनसत्त्व, फॉस्फरस, कॅल्शियम, आयर्न आणि बीटा कॅरोटिन असते. नवी दिल्लीतील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. आनंद कुमार सिंह यांनी सांगितले की अळूच्या प्रत्येक पानात एस्कार्बिक अॅसिड, फोलिक अॅसिड, रायबोफ्लेविन, 'ब' जीवनसत्त्व, बी-सायटोस्टेरॉलसारखे घटक असतात. अनेक खनिजे अळूच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. 'थियोनिन' नावाचे अमिनो अॅसिडही अळूच्या पानांमध्ये असते. शरीरात रक्ताची कमतरता असल्याचे अळू उपयुक्त ठरतो. 

अळूची पानांना ‘अरबी के पत्ते’ किंवा ‘कोलोकॅशिया लीव्हज्’ असे म्हटले जाते.  हे संपूर्ण झाडच पोषणयुक्त आहे.  अळूची पाने, त्याचे देठ आणि मुळेसुद्धा स्वयंपाकात वापरली जातात आणि त्यांच्यातून खूप उच्च पोषण मिळते. मात्र, हे घटक कधीही कच्चे खाता कामा नयेत. अळूची पाने अगदी सहज उपलब्ध होतात आणि  स्वस्त असतात.  अळू अँटिऑक्सिडंट्सने युक्त असतो आणि त्यामुळे आजार रोखण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी अळू खूप चांगला असतो. अळू हा व्हिटॅमिन ‘ए’चा अतिशय चांगला स्रोत आहे. दृष्टी सुधारण्यासाठी हे व्हिटॅमिन अतिशय महत्त्वाचे असते.   व्हिटॅमिन ‘सी’चा उत्तम स्रोत; जो प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करतो.   त्यांच्यात पोटॅशिअम आणि फोलेटही उत्तम प्रमाणात असते; ज्यामुळे तुमचे हृदय आरोग्यदायी राहते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.  या पानात असलेले फायबर्स (तंतू) तुमची पचन यंत्रणा उत्तम राहण्यासाठी मदत करतात.   अळूमध्ये लोह, फॉस्फरस, झिंक, व्हिटॅमिन ‘बी ६’, व्हिटॅमिन ‘सी’, कॉपर आणि मॅंगेनीझही असते. हे सगळे घटक आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. 

अळूमुळे रक्तदाब कमी होऊ शकतो, त्वचेची जपणूक होते.  पचनशक्ती सुधारते. पचन यंत्रणा मजबूत होते.  हृदयरोगांना प्रतिबंध होतो.  दृष्टी सुधारते.  प्रतिकारशक्ती वाढते.   स्नायू आणि चेतासंस्था यांची ताकद वाढते.  ढाळ, क्रॅंपिंग, बद्धकोष्ठता, पोट फुगणे, गॅसेस या सगळ्या गोष्टींना अळूमुळे प्रतिबंध होतो आणि शरीराचे एकूण आरोग्य सुधारते. (अनिकेत फिचर्स)


No comments:

Post a Comment