Monday, 12 April 2021

अशी घ्या उन्हाळ्यात पोटाची काळजी


सध्या उकाडा प्रचंड वाढत चालला आहे. उन्हामुळे सर्वांनाच त्रास होतोय. त्यामुळेच अनेकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांमध्ये पोटाचे विकार सर्वाधिक दिसून येतात. बहुतांश लोक उन्हाळ्यात पोटदुखीच्या त्रासानं हैराण झालेले असतात. अशा वेळी उन्हाळ्यातील दिवसात पोटाशी संबंधित नेमके कोणकोणते त्रास होतात आणि त्याचा प्रतिबंध व उपचार कसा करावा, याबद्दल अधिक जाणून घेऊ या. उन्हाळा म्हणजे उकाडा. घाम, चिकटपणा आणि त्यासोबत येणारे वेगवेगळे आजार. सर्दी, खोकला आणि तापानंतर या दिवसांत सगळ्यात जास्त त्रास देतं ते म्हणजे पोट. उन्हाळ्याच्या काळावधीत उच्च तापमान व्यक्तीच्या मनावरच नव्हे तर शरीरावरही परिणाम करतं. उष्णतेमुळे व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होत जाते. त्यामुळे पोटासंबंधी विकार उद्भवू लागतात. पोटाचे आजार म्हणजेच पचनसंस्थेचे आजार. ते उन्हाळ्याच्या दिवसांत अधिक बळावतात. उन्हामुळे प्रचंड घाम येऊन शरीरातील पाणी निघून जात असल्यानं अनेकदा पोटविकार होतात. याशिवाय अस्वच्छ अन्न आणि दुषित पाण्यामुळे ही समस्या उद्भवते. याव्यतिरिक्त ताप येणं, वेदना जाणवणं, थकवा, अशक्तपणा, पोटदुखी आणि अगदी डोकेदुखीच्या तक्रारीही उन्हाळ्याच्या काळात दिसून येतात. उलट्या होणं, त्वचेवर लाल पुरळ उठणं,अॅसिडिटी, छातीत जळजळ होणं, चक्कर येणं, अशक्तपणा, महिलांमध्ये युरीन इन्फेक्शन, डायरिया  आणि ताप यासारख्या समस्याही उन्हाळ्यात आढळून येतात. उन्हाळ्यात अपचनाची समस्या टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी?

• पौष्टिक आहाराचं सेवन करा. फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.

• ताजी फळं, भाज्या, डाळी, सोयाबीन आणि शेंगदाणे खावेत.

•टोमॅटो, सफरचंद्र, नाशपती, टरबूज, काकडी, गोड बटाटे आणि अननस आहारात असू द्या.

• उष्णतेमुळे घामावाटे शरीरातील पाणी निघून जातं. म्हणून जास्तीत जास्त पाणी प्यावं. पाणी न प्यायल्यानं अतिसाराची समस्या उद्भवू शकते.

• मसालेदार, तळलेले आणि जंकफूडचे सेवन करणं टाळावं. यामुळे पोटात जळजळ होऊ शकते.

•पिझ्झा, चिप्स आणि बेकरी पदार्थ खाऊ नयेत.

• आतड्यामध्ये असणारे बॅक्टेरियासाठी प्रोबायोटिक्स अतिशय उपयुक्त ठरू शकतात.

• रस्त्याच्या बाजूला उघड्यावर असलेलं अन्न खाणं टाळा आणि शिळं अन्न खाऊ नका. कारण यामुळे विषबाधा होऊ शकते.

•दररोज व्यायाम करा. योग, पोहणे, सायकलिंग, धावणं आणि एरोबिक्स देखील करु शकता.

•नियमितपणे व्यायाम केल्यास आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होते. शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवून विविध आजारांना दूर ठेवता येऊ शकतं.


No comments:

Post a Comment