Sunday 1 March 2020

कढीपत्ताचे औषधी गुणधर्म

कढीपत्ता हा नेहमीच्या स्वयंपाकात वापरला जाणारा घटक असून या गुणकारी घटकामध्ये अनेक गुणकारी गुणधर्म असतात. त्यामुळेच कढीपत्त्याची पाने ताटातून बाजूला काढून न ठेवता खाण्याकडे कटाक्ष ठेवावा. कढीपत्त्याच्या सेवनाने हृदयविकारावर नियंत्रण ठेवता येतं. यातील अँटिऑक्सिडंट्समुळे रक्तातलं कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होतं. मधुमेहावरही कढीपत्ता गुणकारी ठरतो. कारण यात मधुमेहविरोधी घटक असतात. तसंच यातील फायबरमुळे इंन्शुलनचं प्रमाण नियंत्रणात राहून रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी पाच ते सहा कढीपत्ते चावून खावेत.
पोटाचे विकार तसंच डायरियामध्ये कढीपत्त्याचं सेवन गुणकारी मानलं जातं. कढीपत्त्यातील कार्बाजोल एल्कालॉएड्स हा घटक पोटासाठी गुणकारी मानला जातो. यामुळे पित्ताची समस्या दूर होते. कढीपत्त्यात अ आणि क जीवनसत्त्व असतं. तसंच बॅक्टेरिया आणि बुरशीविरोधी गुणधर्म असतात. यामुळे छातीत साठलेला कफ दूर होऊ शकतो. त्यासाठी कढीपत्त्याची पूड तयार करून ती चमचाभर या प्रमाणात मधासोबत खावी. कढीपत्त्यामुळे यकृत सुरक्षित राहतं.
वनस्पतीविषयी-कढीपत्ता वा कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग जेवणाची चव वाढविण्यासाठी करतात. चवीसाठी तर याचा वापर होतोच; परंतु त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने अतिशय औषधी असतात. याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असल्यामुळे निरनिराळ्या चटण्यामध्ये, भाज्यांमध्ये व मसाल्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. संस्कृतमध्ये कृष्णिनब तसेच कैटर्य, हिंदीमध्ये मीठानीम, इंग्रजीमध्ये करी लिव्हज, तर शास्त्रीय भाषेत मुर्रया कोएनिगी या नावांनी ओळखला जाणारा कढीपत्ता किंवा गोडिलब हा रुटेसी कुळातील आहे.

No comments:

Post a Comment