Monday, 21 October 2019

कडू कारले आरोग्याला चांगले

चवीने कडू असलेले कारले हे आरोग्यासाठी अत्यंत हितावह आहे. कारले भारतात सर्वत्र पिकते व अतिप्राचीन काळापासून कारल्याचा उपयोग फळभाजी बरोबरच औषधातही केला जातो. संस्कृतमध्ये कंदुरा (करवल्ली), हिंदीमध्ये करेला, इंग्रजीमध्ये कॅरिला फूट्र किंवा बिटर गार्ड म्हणून ओळखले जाणारे कारले ही वनस्पती कुकरबिटेसी या कुळातील आहे. कारले हिरवट, पांढरसर, काळसर हिरव्या रंगांची आणि पिकल्यानंतर आतून लाल, केशरी होतात. कारली मोठी आणि लहान अशा दोन प्रकारची असतात, तर रंगभेदामुळे कारल्याचे पांढरी, हिरवी असेही दोन प्रकार आढळतात. आयुर्वेदानुसार कारली पित्तशामक, वातानुलोमक, कृमिघ्न व मूत्रल आहेत.
कारल्याची पानेही ज्वरनाशक, कृमिनाशक व मूत्रल आहेत. कारल्यामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ह्यअ व ह्यक जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात तर ह्यब जीवनसत्त्व थोडया प्रमाणात असते. या सर्व औषधी गुणधमार्मुळे कारले ही शक्तीवर्धक, पुष्ठीकारक व सारक असल्यामुळे आहाराबरोबरच औषध म्हणूनही वापरतात.
कारल्यांच्या पानांचा ३ चमचे रस एक ग्लासभर ताकातून रोज दुपारी महिनाभर घेतल्यास, मूळव्याधीचा त्रास कमी होतो. या सोबत कारल्याची मुळे स्वच्छ धुऊन वाटून त्याचा कोंबावर लेप लावल्यास मूळव्याधीचे कोंब नाहीसे होतात. खरूज, खाज, नायटे, चट्टे अशा त्वचाविकारांवर कारल्याच्या कपभर रसात चमचाभर लिंबूरस घालून तो उपाशीपोटी सावकाश प्यावा. नियमितपणे असा रस घेतल्याने रक्तदोष कमी होऊन रक्तशुद्ध होते व पर्यायाने त्वचाविकार कमी होतात. मधुमेह झालेल्या रुग्णांनी कोवळ्या कारल्यांचे बारीक काप करून ते उन्हामध्ये सुकवून त्याचे बारीक चूर्ण करावे व हे चूर्ण दररोज सकाळ, संध्याकाळ ५-५ ग्रॅम (अर्धा चमचा) नियमितपणे घ्यावे. यामुळे साखर नियंत्रणात राहते. जंत-कृमी झाले असतील, तर कारल्यांच्या पानांचा रस कपभर नियमितपणे आठ दिवस द्यावा. यामुळे सर्व कृमी शौचावाटे पडून जातात. दारू पिणार्‍या रुग्णांची यकृताची हानी होते. ती हानी भरून काढण्यासाठी व दारूचे व्यसन सोडण्यासाठी कारल्यांच्या पानांच्या रस रोज सकाळ-संध्याकाळ कपभर घ्यावा. दमा, सर्दी, खोकला अशा श्‍वसनमार्गाच्या तक्रारी असतील, तर कारल्याचा रस व तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून त्यात मध मिसळून महिनाभर घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढून हे विकार दूर होतात.

No comments:

Post a Comment