Saturday, 24 June 2023

(आरोग्य) दुधी भोपळा आहारात हवाच!

दुधी भोपळा ही काही सर्वांचीच आवडती भाजी असते  असे नाही. मात्र, दुधी भोपळ्याची खीर आवडीने खाणारे अनेक लोक आहेत. दुधी भोपळा हा चवीसाठी म्हणून नव्हे तर आरोग्य लाभासाठी तरी खाल्ला जावा, असे आहार तज्ज्ञांना वाटते. चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्यांपासून पोटाच्या गंभीर विकारांवर भोपळा गुणकारी ठरू शकतो. भोपळ्याच्या अशाच काही औषधी गुणधर्माबाबत जाणून घेऊ. दुधी भोपळ्यात 'बिटा कॅरोटिन' या घटकाचे प्रमाण बरेच जास्त असते. यामुळे भोपळा हा 'अ' जीवनसत्त्वाचा समृद्ध स्रोत मानला गेला आहे. बिटा कॅरोटिनमधील ऑँटिऑक्सिडंटस्‌मुळे शरीरातील फ्री रेडिकल्सचा सामना अगदी सहज करता येतो. भोपळ्यातील विशिष्ट प्रकारच्या खनिजांमुळे मेंदूच्या नसांना आराम मिळतो. हृदयरोग्यांसाठी भोपळा वरदान मानला जातो. भोपळ्यात कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता असते. आतड्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही भोपळा गुणकरी मानला जातो. 

भोपळ्यामुळे रक्‍तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. बहुसंख्य महिलांमध्ये लोहाची कमतरता आढळते. अशा महिलांनी भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यास लाभ मिळू शकतो.भोपळ्याच्या बियांमध्ये लोह, झिंक, पोटेशियम आणि मॅग्नेशियम यांचे प्रमाण भरपूर असल्याने बरेच लाभ होतात. पोटाच्या विविध विकारांवर भोपळा गुणकारी ठरू शकतो. यातीत्ल फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट स्वच्छ झाल्याने अनेक रोगांना दूर ठेवता येते. 

Sunday, 11 June 2023

जगा आनंदी... राहा निरोगी...

प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धा दिवसागणिक वाढत आहे. त्याने साहजिकच ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. त्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होऊन जीवनशैली बिघडत चालली आहे. ती सुधारण्यासाठी ताणतणाव कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने आनंद आणि आरोग्य यांची सांगड घालून जीवनशैलीमध्ये बदल करणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. समाजातील

नकारात्मक घटकांपासून दूर राहावे -स्वत:मध्ये करायच्या बदलाबाबत मानसोपचारतज्ज्ञ सांगतात की, चांगले जीवन जगण्यासाठी शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही योग्य असणे महत्त्वाचे आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी या दोन्हींमध्ये समतोल असावा. वाढत्या स्पर्धेमुळे जीवन धकाधकीचे, धावपळीचे बनले आहे. किती जरी नाही म्हटले तरी ताणतणाव राहणारच आहे. मग त्यासोबत आनंदी जीवन जणणे, ते प्रत्येकाने शिकणे आवश्यक आहे. यात पहिल्यांदा समाजातील नकारात्मक  घटकांपासून दूर राहावे. व्यसन करू नये. योग्य आहार घ्यावा, तसेच व्यायाम करावा. कामाच्या ठिकाणी आनंदी वातावरण ठेवण्यावर भर द्यावा. 

पुरेशी झोप, सकस आहार घ्यावा -मानसोपचारतज्ज्ञ सांगतात की, दैनंदिन स्वरूपातील जगणं याला आनंदी ठेवण्याला प्राधान्य द्यावे. ताणतणाव घेऊन काम करू नये. तसे झाल्यास त्याचा कामावर आणि त्याबरोबरच शारीरिक, मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो. पुरेशी झोप घ्यावी. व्यायाम करावा. सकस आहार घ्यावा. वाचन, गाणी ऐकणे, एखादे वाद्य वाजविणे आदी स्वरूपातील छंद असल्यास त्याची आवर्जून जोपासना करावी. वृत्ती आनंदी राहिल्यास आरोग्य निरोगी राहण्यास चांगली मदत होते. 

आनंदी देशांच्या यादीत १२५ वा क्रमांक - संयुक्त राष्ट्रांर्फ जगभरातील आनंदी देशांची यादी जाहीर केली जाते. वर्ल्ड हॅपिनेस रँकिंग ठरविली जाते. यंदा मार्च महिन्यात रॅंकिंग जाहीर करण्यात आले. त्यात फिनलंड देश सलग सहाव्यांदा प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर डेन्मार्क, आइसलँड, इस्त्रायल, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे, स्वित्झर्लंड, लक्‍सेंबर्ग, न्यूझीलंड यांचा क्रम आहे. आपल्या भारत देशाचा क्रमांक १२५ वा आहे. महाराष्ट्रातील लोकांमध्ये सकारात्मकता वाढावी या उद्देशाने सन २०१८ मध्ये राज्य सरकारने मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशच्या धर्तीवर आनंद मंत्रालय स्थापन करण्याचा विचार केला. 

हॅपिनेस इंडेक्स म्हणजे काय? - हॅपिनेस इंडेक्स म्हणजे आनंदाचा निर्देशांक आहे. या निर्देशांकाचे मोजमाप हे संबंधित देशातील नागरिकांचे वैयक्तिक पातळीवर समाधान, त्या लोकांचे राहणीमान, देशाचे दरडोई उत्पन्न, आयुर्मान असे निकष आहेत. या निकषांचे मूल्यमापन करून तो देश किती आनंदी असल्याचे हे ठरविण्यात येते. या पद्धतीने आनंदाचा निर्देशांक ठरविला जातो. 




Saturday, 10 June 2023

चांगल्या आरोग्यासाठी जमिनीवर झोपा

 जणांची तक्रार असते की रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही. त्यामुळे दिवसाची सुरवात निरुत्साहाचे होते. त्यांच्यासाठी जमिनीवर झोपण्याचे आरोग्याला अनेक फायदे असून झोपही शांत लागते. शरीराला आराम तर मिळतोच सोबतच तुमच्या अनेक समस्याही दूर होतात. त्यामुळेच तरुणांसह वृद्ध व्यक्तीही जमिनीवर झोपण्याला पसंती देत असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. 

बॉडी पोश्‍चर(शरीर मुद्रा ) होते चांगले 

जमिनीवर झोपल्याने तुमच्या स्नायूंवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त दबाव पडत नाही. तसेच हाडेही नैसर्गिक स्थितीमध्ये असतात. बेडवर किंवा मुलायम गादीवर झोपल्याने तुम्हाला चांगले तर वाटते पण त्याने बॉडी पोश्‍चर बिघडू शकतो. पण जमिनीवर एका चादरीवर झोपल्याने बॉडी पोश्‍चर चांगला राहतो. 

हिप्स आणि खांद्यासाठी फायदेशीर 

 जमिनीवर झोपल्याने हिप्स आणि खांद्यांचे अलायमेंट चांगले होते आणि शरीरातील अनेक प्रकारचे दुखणे दूर होते. जर तुमच्या  खांद्यामध्ये, मानेमध्ये सतत वेदना होत असतील तर जाड गादीवर झोपण्यापेक्षा खाली जमिनीवर झोपणे सुरू करा. 

जमिनीवर झोपल्याने केवळ तणावच नव्हे तर  निद्रानाशासारख्या अनेक समस्यांवर मात करता येते. पाठदुखीचा त्रास दूर होतो. शास्त्रांमध्ये जमिनीवर झोपणे आरोग्यासाठी आदर्श मानले आहे. हिंदू धार्मिक विधानांमध्ये जमिनीवर चटई किंवा पातळ चादर  टाकून झोपणे आवश्यक मानले आहे. यामुळे मानसिक रोगही कमी होतात. असे आयुर्वेद तज्ज सांगतात. 

Friday, 9 June 2023

ब्रेकफास्ट कसा असावा?

ब्रेकफास्टचे जीवनात महत्व वाढले आहे. भारतीय पारंपरिक पद्धतीत न्याहारीचे वेगळेच महत्व सांगितले जाते. न्याहारी अथवा ब्रेकफास्ट हे दिवसभर उत्साही ठेवते. सकाळीच न्याहारीचा सल्ला दिला जातो, ज्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. पण वजन कमी झाल्याने किंवा घाईमुळे बरेच लोक नाश्ता सोडतात. त्याचबरोबर काही लोक अशा गोष्टी खातात, ज्यामुळे त्यांना नंतर पश्‍चाताप करावा लागतो. या गाष्टींचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या गोष्टी घेतल्याने चयापचयावर खूप वाईट परिणाम होतो. 

लिंबू पाण्यासोबत मध 

वजन कमी करण्यासाठी अनेक लोक लिंबू पाण्यात मध मिसळतात. पण आजकाल बाजारात भेसळ नसलेला मध मिळणे खूप अवघड आहे. या मधामध्ये भरपूर कॅलरीज असतात. त्यात हायग्लायसेमिक इंडेक्स आहे. ते रिकाम्या पोटी घेतल्याने रक्‍तातील साखरेची पातळी वाढू शकते. यामुळे असे करणे टाळावे. 

फळ टाळण्याचा सल्ला 

बहुतेक लोकांना असे वाटते की सकाळी फळाची वाटी आरोग्यासाठी खूप चांगली असते. पण पोषणतज्ञ हे टाळण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते इतर पदार्थांच्या तुलनेत फळे सहज पचतात. त्यामुळ तासाभरात भूक लागते. यासोबतच सकाळी रिकाम्या पोटी आंबट फळे खाल्ल्याने अँसिडिटीचा त्रास होऊ शकतो. 

एसिडिटीबाबत सजग राहा

 भारतीयांना सकाळ चहा किंवा कॉफीची सवय आहे. सुस्ती दूर  करण्यासाठी आणि उत्साही राहण्यासाठी बरेच लोक सकाळी रिकाम्या पोटी चहा  किंवा कॉफी पितात. परंतु ते पोटात असिड निर्माण करू शकतात. यामुळे पोट खराब होऊ शकते आणि पचनाशी संबंधित इतर अनेक समस्या उद्धवू शकतात. त्यामुळे सकाळी चहा किंवा कॉफी पिणे टाळा. त्याऐवजी तुम्ही इतर कोणतेही आरोग्यदायी पेय घेऊ शकता. 

नाश्त्यामध्ये गोड पदार्थ नको 

सकाळी नाश्त्यात गोड पदार्थ खाऊ नका. यामुळे रक्‍तातील साखरेची पातळी वाढू शकते. यामुळे तुम्ही कमी ऊर्जावान राहता. म्हणूनच सकाळी खूप गोड नाश्ता करणे टाळा. 

(टीप-वरील माहितीचा उपयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)