Tuesday, 20 April 2021

शेवग्याचे सेवन आरोग्याला हितकारक


आपल्या खाद्यसंस्कृतीत शेवग्याला विशिष्ट असे स्थान आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीला शेवग्याच्या पानांची भाजी आवर्जून केली जाते. शेवग्याच्या फुलांची भाजी, शेवग्याच्या शेंगांची भाजी, शेवग्याच्या शेंगांचे सार, शेंगा, फ्राय, लोणचे तयार करता येते. ओरिसामध्ये शेवग्याच्या शेंगा वापरून छुई आळू पोटळं भजा ही परतलेली कोरडी भाजी बनविली जाते. उडप्यांच्या हॉटेलातील सांबारात शेवग्याच्या शेंगेला विशिष्ट स्थान आहे.. शेवगा गरम, हलका, मधुर, तिखट, अग्निप्रदीपक, रुचकर, दाहकारक, वीर्यवर्धक, पित्त वरक्त प्रकोपक असून, शेवग्याची भाजी वातविकार दूर करणारी आहे. शेवग्याच्या मुळांचा रस काढून किंवा त्याच्या काढ्यात मध घालून घेतल्याने गळू बरे होतात. शेवग्याच्या खोडातून एक भुया रंगाचा डिंक मिळतो. तसेच बियांमधून रंगरहित तेल मिळते. तसेच मोठया प्रमाणात खनिजे आढळतात. शेवग्यापासून जीवनसत्त्व अ, क तसेच ई तयार करतात. पाणी शुद्धीकरणात शेवग्याच्या बियांचा वापर होतो. शेवग्याच्या पानांचा रस प्यायल्याने उचकी थांबते व धाप लागणे कमी होते. शेवग्याच्या पानांच्या रसात चमचाभर साखर घेऊन तो तीन दिवस प्यायल्याने वायूने आलेला गोळा नाहीसा होतो. शेवग्याच्या पानांच्या रसाने डोके चोळले असता डोक्यातील कोंडा निघून जातो.

मस्तकशूळ झाला असल्यास शेवग्याच्या पानांच्या रसात मिरे वाटून त्याचा लेप लावावा. पोट फुगले असल्यास शेवग्याच्या पानांच्या रसाचा काढा तयार करून त्यात हिंग व सुंठ घालून तो प्यावा. वाळलेल्या शेवग्याच्या शेंगांचं चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरलं जातं. तोंड येण्याची समस्या सतावत असलेल्यांनी याच्या पानांचा आहारात समावेश करावा. यात कॅल्शिअम, लोह आणि इतर जीवनसत्त्वांचा भरपूर प्रमाणात साठा असतो. त्यामुळे हाडांची मजबुती राखण्यास मदत होते. शेवग्याचा रस नियमित आहारात घेतल्यास हाडं मजबूत होतात.

रक्तशुद्धीकरण होऊन त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते. रक्तातील साखरेची पातळी कमी करत असल्याने मधुमेही रुग्णांनी शेवग्याचं सेवन करणं आवश्यक आहे. घसा खवखवणे, घसा सुजणे किंवा सर्दी झालेल्या लोकांनी या भाजीचं सूप प्यावं म्हणजे लवकर आराम पडतो. अस्थमा, ब्राँकायटिस आणि क्षयरोग असलेल्या लोकांनी ही भाजी खावी, म्हणजे त्रास कमी होतो. गरोदर महिलांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं, जेणेकरून प्रसुतीपूर्व आणि नंतर होणारे त्रास कमी होतात. तसंच प्रसूतीनंतर मातेला स्तनपानासाठी आवश्यक असणारं दूध शेवग्याच्या सेवनाने वाढतं आणि गर्भाशयाला आलेलं जडत्व कमी होण्यास मदत होते. मासिक पाळी अनियमित असलेल्यांनी शेंगाचा ज्युस २१ दिवस प्यायल्याने पाळी नियमित होते. तसंच पाळीदरम्यानची पोटदुखीही थांबते. शेवगा अँटिबॅक्टेरिअल म्हणूनही काम करतो. त्यामुळे संसर्ग होण्याचा संभव कमी असतो. उत्तम पाचक म्हणून कार्य करते. बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवत नाही. नियमित सेवनाने त्वचेचा पोतही सुधारतो.


Monday, 12 April 2021

अशी घ्या उन्हाळ्यात पोटाची काळजी


सध्या उकाडा प्रचंड वाढत चालला आहे. उन्हामुळे सर्वांनाच त्रास होतोय. त्यामुळेच अनेकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांमध्ये पोटाचे विकार सर्वाधिक दिसून येतात. बहुतांश लोक उन्हाळ्यात पोटदुखीच्या त्रासानं हैराण झालेले असतात. अशा वेळी उन्हाळ्यातील दिवसात पोटाशी संबंधित नेमके कोणकोणते त्रास होतात आणि त्याचा प्रतिबंध व उपचार कसा करावा, याबद्दल अधिक जाणून घेऊ या. उन्हाळा म्हणजे उकाडा. घाम, चिकटपणा आणि त्यासोबत येणारे वेगवेगळे आजार. सर्दी, खोकला आणि तापानंतर या दिवसांत सगळ्यात जास्त त्रास देतं ते म्हणजे पोट. उन्हाळ्याच्या काळावधीत उच्च तापमान व्यक्तीच्या मनावरच नव्हे तर शरीरावरही परिणाम करतं. उष्णतेमुळे व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होत जाते. त्यामुळे पोटासंबंधी विकार उद्भवू लागतात. पोटाचे आजार म्हणजेच पचनसंस्थेचे आजार. ते उन्हाळ्याच्या दिवसांत अधिक बळावतात. उन्हामुळे प्रचंड घाम येऊन शरीरातील पाणी निघून जात असल्यानं अनेकदा पोटविकार होतात. याशिवाय अस्वच्छ अन्न आणि दुषित पाण्यामुळे ही समस्या उद्भवते. याव्यतिरिक्त ताप येणं, वेदना जाणवणं, थकवा, अशक्तपणा, पोटदुखी आणि अगदी डोकेदुखीच्या तक्रारीही उन्हाळ्याच्या काळात दिसून येतात. उलट्या होणं, त्वचेवर लाल पुरळ उठणं,अॅसिडिटी, छातीत जळजळ होणं, चक्कर येणं, अशक्तपणा, महिलांमध्ये युरीन इन्फेक्शन, डायरिया  आणि ताप यासारख्या समस्याही उन्हाळ्यात आढळून येतात. उन्हाळ्यात अपचनाची समस्या टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी?

• पौष्टिक आहाराचं सेवन करा. फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.

• ताजी फळं, भाज्या, डाळी, सोयाबीन आणि शेंगदाणे खावेत.

•टोमॅटो, सफरचंद्र, नाशपती, टरबूज, काकडी, गोड बटाटे आणि अननस आहारात असू द्या.

• उष्णतेमुळे घामावाटे शरीरातील पाणी निघून जातं. म्हणून जास्तीत जास्त पाणी प्यावं. पाणी न प्यायल्यानं अतिसाराची समस्या उद्भवू शकते.

• मसालेदार, तळलेले आणि जंकफूडचे सेवन करणं टाळावं. यामुळे पोटात जळजळ होऊ शकते.

•पिझ्झा, चिप्स आणि बेकरी पदार्थ खाऊ नयेत.

• आतड्यामध्ये असणारे बॅक्टेरियासाठी प्रोबायोटिक्स अतिशय उपयुक्त ठरू शकतात.

• रस्त्याच्या बाजूला उघड्यावर असलेलं अन्न खाणं टाळा आणि शिळं अन्न खाऊ नका. कारण यामुळे विषबाधा होऊ शकते.

•दररोज व्यायाम करा. योग, पोहणे, सायकलिंग, धावणं आणि एरोबिक्स देखील करु शकता.

•नियमितपणे व्यायाम केल्यास आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होते. शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवून विविध आजारांना दूर ठेवता येऊ शकतं.


Friday, 19 February 2021

सकाळी लवकर उठणे सर्वांसाठी फायदेशीर


अनेक यशस्वी लोकांना सकाळी उठून आपली कामे करण्यास पुरेसा वेळ मिळतो. ठरलेल्या नियोजन, कामाव्यतिरिक्त कामे करण्यासाठी त्यांना वेळ मिळतो. लवकर उठल्याने त्यांचे आरोग्य टिकून राहते. दवाखान्यात ढिगभर पैसे घालवण्याची वेळ त्यांच्यावर सहसा येत नाही. त्यामुळे लवकर उठून उत्साहाने, सकारात्मक विचारांनी कामाला सुरवात झाल्यास आपल्या कामात यश हमखास मिळते. सकाळी लवकर उठल्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात फ्रेश होते. उत्साह येतो. दिवसभर आपल्याला कोणती कोणती कामे करायची आहेत, हे पटकन सुचते. ती कामे पूर्णत्वास होण्यासाठी आपले प्रयत्न सुरू होतात. सकाळी लवकर उठून तुम्ही मॉर्निंग वॉक, जीम अथवा घरच्या घरी व्यायाम करू शकता. शुध्द हवेत ऑक्सिजन मुबलक प्रमाणात असल्यामुळे तुम्ही फ्रेश वातावरणात रनिंग (पळायला, चालायला) जाऊ शकता. घरी पूजा, प्रार्थना वेळेवर करता येतात. घरातील अन्य व्यक्तींना त्यांच्या कामात मदतही करू शकता. सकाळी उठून शांत वातावरणात अभ्यासही करता येतो. काही वेळा वेळ झाला म्हणून आपण नाष्ता करत नाही. न खाताच आपण बाहेर पडतो. पण, सकाळी नाष्ता खाणे, आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. काही जण जेवूनच बाहेर पडतात. अशावेळी नाष्ता किंवा जेवायला पुरेसा वेळ मिळतो. वेळेवर रेल्वे, बस मिळावी म्हणून पटपट कामे आवरून बाहेर पडू शकता. वेळेवर शाळा, कॉलेज, कामाला जाऊ शकता. मग, इथे तुमची धावपळ होणार नाही. अगदी पळापळ न करता, तुम्ही ही सर्व कामे आटोपशीर आणि व्यवस्थितपणे पार पाडू शकता. सकाळी लवकर उठून जर तुम्ही बाहेर फिरायला गेलात तर निसगार्चा आनंद तुम्हाला घेता येईल. सूर्योदय पाहणे, हे अनेकांना जमत नाही. पण, लवकर उठून गेल्यानंतर उगवता सूर्य पाहणे, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणे, एकांत आणि शांत वातावरणात चालणे, हे सर्व तुम्हाला तुमचे मानसिक आरोग्य जपायला कारणीभूत ठरते. चालल्याने, रनिंग, मेडिटेशन, व्यायाम केल्याने तुमचे आरोग्य सुधारते. तुम्ही फिट राहू शकता. जे लोक लठ्ठ आहेत, त्यांच्यासाठी तर लवकर उठून व्यायाम करणे, वॉकिंगला जाणे आवश्यक आहेत. शरिरातील अतिरिक्त चरबी करण्यासाठी हा सर्वात चांगला पर्याय आहे. काही जण मोकळ्या हवेत फिरतात, तर काही जण मैदान निवडतात, काहींना बागेत हिरव्यागार गवतावर अनवाणी चालायला आवडते. यामुळे तुम्ही मानसिक तणावापासून दूर राहू शकता. अनेक वेगवेगळ्या आयडिया तुम्हाला सूचतात. आत्मविश्‍वास वाढण्याबरोबरच स्फूर्ती येते. हा उत्साह रात्रीपर्यंत कायम टिकून राहतो.

Tuesday, 1 December 2020

पळवून लावेल करोना, जो खाईल बेदाणा


आयुर्वेदामध्ये बेदाण्याला महत्त्व आहेच. शरीराची रोजची झीज भरून काढण्यासाठी बेदाणा उपयुक्त तर आहेच, पण जिभेवर रेंगाळणारी चव देण्याची क्षमताही  बेदाण्यामध्ये आहे. च्यवनप्राशसारख्या आयुर्वेदिक औषधामध्ये बेदाण्याचा मूलभूत घटक म्हणून वापर करण्यात येतो. सुक्या मेव्यातील अन्य घटकापेक्षा बेदाणा स्वस्त असल्याने याचा भरपूर वापर यामध्ये करण्यात येतो. बेदाण्याचे आयुर्वेदात अनेक फायदे सांगितले आहेत. पोटॅशियम, लोह, कॅल्शियम यांची शारीरिक गरज बेदाणा पूर्ण करू शकतो. तसेच मूत्रपिंडाचे काम कार्यक्षम करण्यास उपयुक्त ठरतो असे आहारतज्ज्ञांचे मत आहे. दिवसभराच्या श्रमाने शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी २४ तासांत केवळ ३० ग्रॅम बेदाणा उपयुक्त ठरू शकतो. लहान मुलांना पौष्टिक आहार म्हणून बेदाण्याचा वापर उपयुक्त ठरू शकतो. याबाबत अंगणवाडीतील मुलाबरोबरच शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश होण्याची गरज आहे. दरवर्षी सव्वा ते दीड लाख टन बेदाणा उत्पादन होत असताना या वर्षी कोरोनामुळे हे उत्पादन दोन लाख टनांपर्यंत गेले. दिवाळीपर्यंत यापैकी दीड लाख टन बेदाणा विक्री झाली असून दरही प्रतवारीनुसार १०० रुपयांपासून २६५ रुपयांपर्यंत मिळाला. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतची बेदाणा उलाढाल २ हजार कोटींच्या घरात गेली आहे. तासगावच्या बेदाण्याला दोन वर्षांपूर्वी भौगोलिक मानांकन मिळाले. याचाही फायदा यंदा उत्पादकांना झाला. भविष्यात बेदाण्याकडे वळलेला ग्राहक स्वस्तातील बुस्टर म्हणून बेदाण्याकडे कायमचा आकर्षति ठेवण्यासाठी आता प्रबोधन आणि प्रसार करण्याची गरज आहे. ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ अशी जाहिरात करून पोल्ट्री उद्योगाने बस्तान बसवले तसेच ‘पळवून लावेल करोना, जो खाईल बेदाणा’ अशा स्वरूपाचे प्रचारकी वाक्य वापरून बाजारपेठेत बस्तान बसविणे अवघड नाही. करोना संकट नसून एक संधी म्हणून बेदाणा उत्पादकांनी याकडे पाहण्याची गरज आहे.

तासगाव, पंढरपूर आणि विजापूर ही बेदाणा निर्मितीची मुख्य केंद्रे आहेत. यापैकी तासगावचा बेदाणा हा अन्य ठिकाणच्या बेदाण्यापेक्षा सरस ठरतो. याचे कारण इथल्या माती, हवा आणि पाणी यामध्ये आहे. कोरडे आणि शुष्क हवामान, निचऱ्याची जमीन आणि प्रदूषणमुक्त पाणी हे मूलभूत घटक मुबलक असल्याने बेदाण्याचा दर्जा कायम ठेवण्यात येथील शेतकरी यशस्वी होतीलच, पण कष्टाळू शेतकरी प्रयोगशाळेतील संशोधनापेक्षा स्वत संशोधक असल्याने अनेक अडचणीवर मात करीत बेदाण्याचा उत्तम दर्जा राखण्यात यशस्वी ठरले आहेत. या परिसरात हिरवा आणि पिवळा अशा दोन पद्धतीचा बेदाणा तयार करण्यात येतो.  फळछाटणीनंतर किमान १२० दिवस झाल्यानंतर द्राक्ष मण्यामध्ये साखर निर्मिती होते. बेदाण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या द्राक्षामध्ये २२ ब्रिक्स आढळले, की माल बेदाण्यासाठी तयार झाल्याचे मानले जाते. द्राक्ष वेलीवरून काढल्यानंतर त्यातील पाण्याचा भाग लवकर निघून जावा यासाठी डिपिंग ऑइल आणि पोटॅशियम काब्रेनेटच्या द्रावणामध्ये बुडवले जाते. त्यानंतर सुकविण्यासाठी रॅकवर द्राक्षे पसरली जातात. जर तपमान ३० ते ३२ सेल्सियस असेल तर नवव्या दिवशी बेदाणा तयार होतो. जर पिवळा हवा असेल तर गंधकाची धुरी दिली जाते. ज्या बेदाण्यात गर आणि गोडी जास्त, चिकटपणा कमी एकसारखा गोल बेदाणा असेल तर तो उत्तम दर्जाचा बेदाणा मानला जातो. ज्या द्राक्ष मण्यामध्ये पाणी जादा असते गर कमी असतो, तो निम्न स्तराचा बेदाणा म्हणून प्रतवारी निश्चित करता येते. प्रतवारीनुसार बेदाण्याचे दर निश्चित होते.

Saturday, 14 November 2020

नाचणी,बाजरी, मका, ज्वारी शरीराला पोषक नाचणी


नाचणीला काही भागात नागली असे म्हणतात. नाचणीचा रंग गडद तपकिरी असून चव उग्र नसते. त्यामुळेच गहू, ज्वारी, तांदळाचे जसे गोड आणि तिखट पदार्थ बनविता येतात, त्याप्रमाणे नाचणीचे सुद्धा गोड व तिखट पदार्थ बनविता येतात. नाचणीचा उपयोग करून पारंपरिक पदार्थांचे पोषण मूल्य वृद्धिंगत करता येते. नाचणीमध्ये तंतुमय पदार्थ जास्त असल्याने नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे नाचणी मधुमेही व्यक्तींसाठी खूप उपयोगी आहे. कारण ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणारे पदार्थ रक्तातील साखर एकदम वाढू देत नाहीत आणि त्यामुळे रक्तशर्करेवर नियंत्रण राहते. मधुमेह पीडित तसेच लहान मुलांच्या आहारात बाजरी प्रमाणेच नाचणीचा समावेश करावा म्हणजे अनेक पोषकतत्त्वे मिळू शकतात. लहान बालके व आजारी व्यक्तींना नाचणीची पेज किंवा सत्त्व दिले जाते. सध्या बाजारात नाचणीचे अनेक मूल्यवर्धित पदार्थ मिळत आहेत. त्यामध्ये नाचणी बिस्किटे, सत्त्व, केक, पापड, शेवई इत्यादींचा समावेश आहे. त्यामुळे आहारात याचा वापर करावा. नाचणीयुक्त अन्नपदार्थांचा वापर हा लहान मुले आणि गरोदर स्त्रिया यांनाही अतिशय लाभदायक ठरतो. वाढत्या वयांच्या मुलामुलींना सुद्धा या पोषण द्रव्यांची जास्त गरज असते. नाचणीयुक्त आहाराने ही गरज भरून काढता येते. नाचणी पचायला हलकी असते. आजारातून उठलेल्या व्यक्तींना नाचणी खायला देतात यामुळे शक्ती किंवा कमजोरी भरून निघते. यामुळे भूक नियंत्रण होण्यास मदत होते. गूळ व नाचणीच्या पिठापासून तयार केलेला हलवा लहान मुलांसाठी शक्तिवर्धक असतो.

बाजरी

बाजरीमध्ये मॅग्नेशिअम, फॉस्फरससारखे अनेक पोषक घटक असतात. वार्धक्याच्या काळात बाजरीची भाकरी तर शक्तिवर्धक व पोषक आहे. आयुर्वेदानुसार बाजरी उष्ण असते, त्यामुळे तिचे सेवन हिवाळ्यात करणे फायदेशीर असते.  बाजरीची भाकरी, गुळाचा खडा व तूप हा आवडीचा आहार आहे. बाजरीची भाकरी व उडदाच्या डाळीची आमटी हा हिवाळ्यातील अतिशय पौष्टिक आहार आहे. शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्या लोकांसाठी बाजरी हा मुख्य आहार आहे. बाजरी हे धान्य खाद्य पदार्थांबरोबरच अनेक औद्योगिक उत्पादनांमध्ये देखील वापरली जाते.

मका

मका हे आपल्या आहारात अन्नधान्य म्हणून तसेच जनावरांसाठी चारा आणि पशुखाद्य आणि औषधी क्षेत्रात बहुउपयोगी अशा तीन प्रकारे उपयोगी पडते. यामध्ये व्यापारीदृष्ट्या महत्त्वाची रसायने आहेत. मक्याच्या दाण्यात १२ टक्के भाग अंकुराचा असतो. या अंकुरापासून तेल मिळते. विविध प्रकारच्या प्रक्रिया करून अनेक प्रक्रिया पदार्थ आणि औषधी उत्पादने तयार करता येतात. मक्यावर प्रामुख्याने दोन प्रकारे प्रक्रिया (मिलिंग) करता येते. कोरडी प्रक्रिया आणि ओली प्रक्रिया. कोरड्या प्रकारात अंकुरविरहित प्रक्रिया करून मक्याची कणी, रवा, पीठ, पोहे, तेल आणि पशुखाद्य तयार करता येते. मक्यावर ओली प्रक्रिया करून स्टार्च, साखर, तेल काढतात. या ओल्या प्रक्रिया पद्धतीने मिळालेला स्टार्च साखर-तेल-पेंड यांचा वापर कापड, कागद, औषधे, बेकरी या व्यवसायात केला जातो. ज्वारीची भाकरी गोडसर चवीची, चांगल्या टिकवण क्षमतेची, आकर्षक, पांढऱ्या रंगाची असते. या भाकरीतील प्रथिनांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि खनिजद्रव्ये अधिकतम आढळतात. ज्वारीची भाकरी ही पचण्यास अतिशय हलकी आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे रोज शक्य नसेल तर आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा तरी ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा. ज्वारीचे पदार्थ खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सर नियंत्रणात राहतो, असे अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. ती ऊर्जा दिवसभर कामी येते.  कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमधील पोषकद्रव्ये पाहता ज्वारीचा आहारात उपयोग केल्यास आहारातील पोषक मूल्यांचे संतुलन योग्य ठेवण्यास मदत होते.

ज्वारीची भाकरी

आहारात तंतुमय घटकांचे महत्त्व  तंतू हे झाडांच्या कोशिकाचे एक घटक असतात. तंतुमय पदार्थ आपल्या आहाराचे एक अंश देखील आहेत. तंतूचे आरोग्यासाठीचे चांगले फायदे आहेत. तंतुमय घटक पाणी शोषून घेतात. ते स्थूलतारोधक असतात. ते आपल्या अन्नाला पाचन नलिकेत जास्त तीव्रतेने संक्रमित करण्यास मदत करतात. एकूणच पचन क्रियेस मदत होते. हे पदार्थ कोलेस्टेरॉलचा (पित्त द्रव) देखील नाश करतात. तंतुमय पदार्थहृदय रोग असणाऱ्या लोकांच्या आहारात असणे फायदेशीर असते.  सर्वच भरड धान्यांमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असल्यामुळे आरोग्यास फायदेशीर असतात.


Friday, 30 October 2020

कवठ


कवठ साधारण छोट्या नारळासारखं दिसतं, त्याला इंग्लिशमध्ये 'वूड अॅपल्स' म्हणतात.कवठ हे रुटेसी कुळातील फळ आहे. कवठाची साल हिरवट पांढऱ्या रंगाची खरबरीत व जाड असते. तर त्याच्या झाडाची पाने आकाराने बारीक असतात. कवठाच्या आतील गर विटकरी रंगांचा असून चवीला आंबट-गोड असतो.  ते पिकलेलं आहे की नाही, हे बघण्यासाठी त्याची 'बाउन्स टेस्ट' उपयोगी पडते. ते कठीण पृष्ठभागावर पाडा. ते बाउन्स झालं, तर त्याचा अर्थ ते पिकलेलं नाही. पिकलेलं असेल, तर ते जमिनीवर एक विशिष्ट आवाज करून पडेल आणि बाउन्स होणार नाही. पूर्णपणे पिकलेल्या कवठाचा गर फिकट करड्या किंवा 'टॉफी माकन' रंगाचा असेल. कवठ हा विटा-कॅरोटिनचा अतिशय उत्तम स्रोत आहे. हे बिटा-कॅरोटिन शरीरात व्हिटामिन 'ए'मध्ये रूपांतरित होतं. कांती नितळ होणं आणि दृष्टी क्षीण न होणं, यासाठी ते उपयोगी पडतं. कवठात व्हिटामिन 'सी' चांगल्या प्रमाणात असल्यानं ते रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी पडू शकतं. संसगांशी लढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. या फळातून रायबोफ्लेविन, कॅल्शिअम, आयर्न आणि फॉस्फरस ही खनिजही मिळतात. कवठ हे शीतकारी, पाचक फळ आहे. पचन वाढवणं, यकृत आणि मूत्रपिंडं 'क्लिन्झ' करण्यासाठी ते उपयोगी पडतं. या फळात अँटी-मायक्रोबिअल गुणधर्म असून, ते खाल्ल्यामुळे घशाला बरं वाटतं. कवठ पचनसंस्थेचं रक्षण करतं. पोटामध्ये अल्सर होतो तेव्हा ते उपयोगी पडतं. अपचन आणि बद्धकोष्ठता यांच्यावर गुणकारी ठरतं. प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात आणि स्नायूंना झालेली दुखापत कमी करण्यासाठी उपयोग होतो. चयापचयाला बळ मिळतं. त्वचा आणि केसांसाठी चांगलं आहे.  कवठ प्रामुख्याने पिकलेलेच खावे. कच्चे कवठ खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि डोकेदुखी होऊ शकते. पिकलेल्या कवठाची चटणी छान लागते, यासाठी  कवठ फोडा आणि त्यातल्या गरातले मोठे तंतू काढून टाका. हा गर हलके स्मॅश करा आणि त्यात तीन टेबलस्पून गूळ, चिमूटभर हळद, तिखट, मीठ, हिंग आणि जिरे घाला. हे सगळं मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या. झाली तुमची चटणी तयार! जेवणात वापर करा.


Thursday, 15 October 2020

दीर्घ श्‍वसनाचे फायदे


श्वास म्हणजे जगणे. आणि तेच दुर्लक्षित केलं जातं. ज्या प्रमाणात श्वसन करायला हवे ते होत नाही आणि मग परिणाम आरोग्यावर दिसायला लागतात. जेव्हा जेव्हा आपल्याला उसंत असते तेव्हा तेव्हा दीर्घ श्वास घ्यायला हवे. व्यायामाचा भाग म्हणून नाही तर जगण्याचे एक रूटीन करायला हवे. व्यायाम, प्रणायम आले की बरीच जन कंटाळा करतात. पण त्यातच संपूर्ण आरोग्य दडलेले आहे. कमीत कमी दीर्घ श्वसन तरी करायलाच हवे. त्याचे फायदे काय असतात ते पाहूया. शरीरातील 70 टक्के विषारी घटक हे श्‍वसनाद्वारे बाहेर टाकले जातात. यामुळे शरीरातील बाकी संस्थांचे हे काम वाचते व आरोग्य उत्तम राहते. मेंदूवरील ताणही कमी होतो. थकवा आल्यास किंवा ताण आल्यास ताठ बसावे व दीर्घ श्‍वसन करावे. यामुळे ताण काही वेळातच हलका होईल. दीर्घ श्‍वसनामुळे शरीरही आरामदायक स्थितीत येते. त्यामुळे शरीरातील स्नायूंना आलेला अनावश्यक ताण नाहीसा होतो व स्नायू सैलावतात. रक्‍तातील हिमोग्लोबीनचा स्तर वाढतो  त्यामुळे शरीरात रक्‍त प्रवाह वाढून शरीरातील प्रत्येक भागाला त्याचा फायदा होतो खासकरून पचनक्रिया सुधारण्यासाठी दीर्घ श्‍वसनाचा खूप फायदा होतो. शरीरातील पेशीन् पेशी कार्यक्षम होते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्‍तीही सुधारते.फुफ्फुसांचा पूर्ण वापर होतो, त्यामुळे  फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते.श्‍वसन दीर्घ झाल्यामुळे रक्‍तात ऑक्सिजन मिसळण्यासाठी व शरीरात रक्‍तपुरवठा करण्यासाठी हृदयाला जास्त कष्ट करावे लागत नाहीत. त्यामुळे हृदयावर ताण येत नाही व त्याचे आरोग्य उत्तम राहते. दीर्घ श्‍वसन केल्यामुळे मणका, मेंदू व मज्जारज्जू इत्यादींमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होऊन त्यांची कार्यक्षमता सुधारते. दीर्घ श्‍वसन केल्यामुळे रक्‍तातील कार्बन डायऑक्साईड बाहेर पडते व रक्‍तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने रक्‍त शुद्ध होते. असे आहे दीर्घ श्वसनाचे फायदे. तर मग आतापासूनच प्रारंभ करा... यासाठी कुठेही जायची गरज नाही. आहे त्या स्थितीत फक्त श्वसन कडे लक्ष केंद्रित करून दीर्घ श्वास घेऊन बघा आणि दोनच मिनिटात फरक जाणवेल.