Friday, 30 October 2020

कवठ


कवठ साधारण छोट्या नारळासारखं दिसतं, त्याला इंग्लिशमध्ये 'वूड अॅपल्स' म्हणतात.कवठ हे रुटेसी कुळातील फळ आहे. कवठाची साल हिरवट पांढऱ्या रंगाची खरबरीत व जाड असते. तर त्याच्या झाडाची पाने आकाराने बारीक असतात. कवठाच्या आतील गर विटकरी रंगांचा असून चवीला आंबट-गोड असतो.  ते पिकलेलं आहे की नाही, हे बघण्यासाठी त्याची 'बाउन्स टेस्ट' उपयोगी पडते. ते कठीण पृष्ठभागावर पाडा. ते बाउन्स झालं, तर त्याचा अर्थ ते पिकलेलं नाही. पिकलेलं असेल, तर ते जमिनीवर एक विशिष्ट आवाज करून पडेल आणि बाउन्स होणार नाही. पूर्णपणे पिकलेल्या कवठाचा गर फिकट करड्या किंवा 'टॉफी माकन' रंगाचा असेल. कवठ हा विटा-कॅरोटिनचा अतिशय उत्तम स्रोत आहे. हे बिटा-कॅरोटिन शरीरात व्हिटामिन 'ए'मध्ये रूपांतरित होतं. कांती नितळ होणं आणि दृष्टी क्षीण न होणं, यासाठी ते उपयोगी पडतं. कवठात व्हिटामिन 'सी' चांगल्या प्रमाणात असल्यानं ते रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी पडू शकतं. संसगांशी लढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. या फळातून रायबोफ्लेविन, कॅल्शिअम, आयर्न आणि फॉस्फरस ही खनिजही मिळतात. कवठ हे शीतकारी, पाचक फळ आहे. पचन वाढवणं, यकृत आणि मूत्रपिंडं 'क्लिन्झ' करण्यासाठी ते उपयोगी पडतं. या फळात अँटी-मायक्रोबिअल गुणधर्म असून, ते खाल्ल्यामुळे घशाला बरं वाटतं. कवठ पचनसंस्थेचं रक्षण करतं. पोटामध्ये अल्सर होतो तेव्हा ते उपयोगी पडतं. अपचन आणि बद्धकोष्ठता यांच्यावर गुणकारी ठरतं. प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात आणि स्नायूंना झालेली दुखापत कमी करण्यासाठी उपयोग होतो. चयापचयाला बळ मिळतं. त्वचा आणि केसांसाठी चांगलं आहे.  कवठ प्रामुख्याने पिकलेलेच खावे. कच्चे कवठ खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि डोकेदुखी होऊ शकते. पिकलेल्या कवठाची चटणी छान लागते, यासाठी  कवठ फोडा आणि त्यातल्या गरातले मोठे तंतू काढून टाका. हा गर हलके स्मॅश करा आणि त्यात तीन टेबलस्पून गूळ, चिमूटभर हळद, तिखट, मीठ, हिंग आणि जिरे घाला. हे सगळं मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या. झाली तुमची चटणी तयार! जेवणात वापर करा.


No comments:

Post a Comment