काळे, पांढरे व लाल अशा तीन वेगवेगळ्या रंगांत तीळ बघायला मिळतात. असे म्हणतात, की प्राचीन काळी सर्वप्रथम तिळातून तेल काढले गेले आणि म्हणून तेल या शब्दाची व्युत्पत्ती तिल या संस्कृत शब्दातून झाली आहे. आयुर्वेदशास्त्राने तीळ व तीळ तेलास दीघार्युष्याचा लाभ देणारे आहारद्रव्य असे पुरस्कृत केले आहे. तिळाच्या अनेक गुणांमधील प्रमुख गुण म्हणजे ते बलदायक, वातनाशक, मातेचे दुग्धवर्धक असे आहे. तीळ हे केस, त्वचा व दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत हितावह आहेत. रोज मूठभर तीळ चावून चावून खाल्ल्यास दात खूपच बळकट होतात, असे काही जाणकार मानतात.
विशेषत: शाळेतील मुले-मुली, तरुण व खेळाडूंसाठी तीळ अत्यंत आरोग्यदायी आहेत. वयात येणार्या बारीक मुलींना तीळ-गूळ नियमित स्वरूपात थंडीच्या दिवसांत खाण्यास द्यावे. यामुळे कुपोषण टळण्यास मदत होते. आधुनिक शास्त्रानुमते तीळ हा कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहे. सर्व तेलबियांमध्ये सर्वाधिक कॅल्शियम तिळामध्ये आहे. परंतु, तिळातील ऑक्झेलेट्स हे कॅल्शियम शरीराला मिळवून देण्यात अडथळा निर्माण करतात. तिळाचा वरचा स्तर काढून टाकल्याने किंवा तिळकूट केल्याने अथवा तीळ चांगले चावून चावून खाल्ल्याने हा कॅल्शियमच्या शोषणाचा अडथळा थोडा कमी करता येतो. थोडक्यात, तिळात भरपूर कॅल्शियम असले, तरी या क्षाराच्या प्राप्तीसाठी निव्वळ तिळावर अवलंबून न राहता अन्नात वैविध्य राखावे.
तिळामध्ये ४६ टक्के फॅट्स आहेत. वजन वाढवू इच्छिणार्यांसाठी ते उत्तम टॉनिक आहे. गव्हाच्या पिठात तिळकूट घालून रोजच्या आहारात तिळाचा समावेश करता येईल. तिळामध्ये हृदयरक्षक इ जीवनसत्त्व आहे. एका शास्त्रीय पाहणीमध्ये तिळाचा हृदयरक्षक फायदा सिद्ध झाला आहे. तिळातील ऑलेथिक अँसिड हे स्निग्धाम्ल वाईट कोलेस्ट्रॉल वाढवते. तिळातील अँटिऑक्सिडंट्स रक्तातील एकूण कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करतात. तिळामध्ये सिसॅमॉल, सिसॅमिनॉल हे अँटिऑक्सिडंट्स आहेत. शरीरातील बाधणारे घटक तीळ कमी करते. त्यामुळे कॅन्सरसारख्या मोठ्या आजारांपासून संरक्षण मिळते. तिळातील कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, झिंक, सेलेनियम, मॅगेनिझ हे क्षार शरीराच्या स्नायूंच्या कार्याचे संतुलन राखण्यास मदत करतात आणि म्हणूनच तीळ हे क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना चांगलेच फायद्याचे आहेत. परंतु, हे फायदे मिळण्यासाठी किमान मूठभर तीळ चांगले चावून खाणे आवश्यक आहे. तिळाचे कूट वापरावे. आहारात तीळ असल्यास पाणी भरपूर प्यावे लागते. तीळ हे हिवाळ्यात खाण्यास उत्तम असून, अत्यंतिक पित्त प्रकृती, मूळव्याध किंवा पचनाचे विकार असणार्यांनी मात्र ते वज्र्य करावे
No comments:
Post a Comment