Thursday, 18 August 2022

कानाची घ्या काळजी


पावसाळ्यात विशेषत: डोळे, नाक आणि घशात संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.  या ऋतूत जीवाणू आणि विषाणूदेखील हवेत तरंगत असल्याने शरीराच्या या भागांवर त्यांचा सर्वाधिक हल्ला होत असतो.  याशिवाय या ऋतूमध्ये वातावरणात सतत आर्द्रता राहते, त्यामुळे बुरशी म्हणजेच फंगस तयार होतात. बुरशी म्हणजेच फंगस कानाच्या संसर्गाचे प्रमुख कारण आहे.  कानात धूळ जमा होते, त्यामुळे खाज सुटते आणि कधी कधी तीव्र वेदनाही होतात.  कानाला तीव्र खाज सुटली की, अनेकजण काड्या, पेन-पेन्सिल, चावी इत्यादी कानात घालून खाजवतात.  अशा प्रकारे संसर्गाचा धोका आणखी वाढतो.  बाहेरील वस्तूला चिकटलेल्या जीवाणूंचा कानांवर परिणाम होतो.कान हा शरीराचा अतिशय संवेदनशील भाग आहे.  त्यात संसर्ग झाल्यास, कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास आणि वेळेत उपचार न केल्यास व्यक्तीच्या श्रवणशक्तीवर परिणाम होतो.  हळूहळू ऐकण्याची क्षमता कमी होऊ लागते.  त्यामुळे कानाच्या संसर्गाकडे कोणत्याही स्वरूपात दुर्लक्ष करू नये.

बुरशीचे बीजाणू दमट हवामानात झपाट्याने वाढतात, ज्यामुळे पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्ग खूप मोठ्या प्रमाणात होतो.  त्वचा आणि डोळ्यांव्यतिरिक्त या बुरशीजन्य संसर्गाचा कानांवरही परिणाम होतो. खरं तर पावसाळ्यात कानाला संसर्ग होण्याचा हा प्रकार सामान्य आहे.जेव्हा वातावरणातील आर्द्रता वाढते तेव्हा बुरशीजन्य संसर्गास कारणीभूत असलेल्या जीवाणूंचे पुनरुत्पादन देखील वाढते.  यामुळे कानात खाज सुटते आणि वेदना होतात.  याशिवाय कानात खाज येण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमुळेही कानात संसर्ग होण्याचा धोका असतो.  ओटोमायकोसिस या बुरशीजन्य संसर्गामुळे पावसाळ्यात कानाला त्रास होतो.

याशिवाय सर्दी झाली तरी कानावर परिणाम होऊ शकतो.  कारण थंडीमुळे होणारे बॅक्टेरिया किंवा वायरसदेखील कानांवर परिणाम करू शकतात.  तज्ञ म्हणतात की स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया आणि हिमोफिलस इन्फ्लूएन्झा हे जीवाणू कानाच्या संसर्गाचे मुख्य कारण आहेत.  पावसाळ्यात त्याची झपाट्याने वाढ होते.कधी कधी गढूळ, साचलेल्या डबक्यातील,गटारीतील घाणेरड्या पाण्यात चालल्यानेही हे जीवाणू आपल्या शरीरात चिकटून आपला प्रभाव दाखवू लागतात.  अनेकदा मुले खेळताना याकडे लक्ष देत नाहीत आणि पावसात साचलेल्या पाण्यात उड्या मारतात  अशाप्रकारे या ऋतूमध्ये लहान मुलांना कानाच्या संसर्गाचा जास्त त्रास होतो.

कानाच्या संसर्गाची प्रमुख लक्षणे म्हणजे सूज, जळजळ, खाज सुटणे, कान अडकणे, कान दुखणे, कानातून दुर्गंधीयुक्त पाणी गळणे, कधी कधी चक्कर येणे, डोकेदुखी, ऐकू न येणे, ताप येणे इत्यादी.  अशी लक्षणे दिसू लागल्यावर ताबडतोब सावध होऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कानाचे संसर्ग टाळण्यासाठी पावसाळ्यात कान स्वच्छ आणि कोरडे ठेवा.  आंघोळ करताना कानात पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी.  आंघोळीनंतर कान नेहमी स्वच्छ आणि कोरडे करा.  यासाठी कोरडे व स्वच्छ सुती कापड वापरणे योग्य ठरेल.

इअरबड्स आणि कॉटन स्‍वॅबपासून दूर राहा, कारण ओलसर हवामानात कॉटन स्‍वॅब जिवाणूंना अडकवू शकतात आणि तुमच्या कानात संसर्ग पसरवू शकतात.

घशाचा संसर्ग आपल्या कानाच्या संसर्गामध्ये देखील वेगाने पसरू शकतो म्हणून, आपण थंड अन्न आणि पेय टाळून आपल्या घशाची योग्य काळजी घेतली पाहिजे.आजकाल लोकांमध्ये फोनमधील गाणी, बातम्या इत्यादी ऐकण्याचा ट्रेंड वाढत आहे.  यासाठी लोक अनेकदा इअरफोन वापरतात.  पण फार कमी लोक इयरफोनच्या स्वच्छतेची काळजी घेतात.  या हंगामात इयरफोन अनेक प्रकारचे जीवाणू आणि व्हायरसचे वाहक देखील असू शकतात.त्यामुळे कानाला संसर्ग होऊ नये म्हणून इअरफोन स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.  संसर्गमुक्त करण्यासाठी सॅनिटायझर इत्यादींचा वापर करता येईल.

जेव्हा जेव्हा कानाच्या समस्या उद्भवतात तेव्हा थेट तज्ञांचा सल्ला घ्यावा.  अनेक जण बसस्थानक,रेल्वे स्टेशन किंवा इतर ठिकाणी फिरणाऱ्या लोकांचा कान स्वच्छ करण्यासाठी मदत घेतात. कानातला मळ स्वच्छ केल्यास कानाची समस्या दूर होईल असा त्यांचा विश्वास आहे.  पण ते धोकादायक ठरू शकते.बरेच लोक घरगुती उपायांचा अवलंब करतात आणि काही वनस्पतींचा रस वगैरे कानात घालतात.  हे करणे टाळा, कारण कानात काहीही घालणे धोकादायक ठरू शकते.

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली