अनेक विकारांवर केल्या जाणार्या घरगुती उपचारांमध्ये जायफळाचा उपयोग फार जुन्या काळापासून चालत आला आहे. जायफळामध्ये बॅक्टेरियाचे संक्रमण रोखणारी तत्वे असून यामध्ये अँटी ऑक्सिडंट्सचे प्रमाणही मुबलक आहे. त्यामुळे याच्या उपयोगाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. आयुर्वेदानुसार जायफळ अनेक विकारांवर गुणकारी आहे. अपचन, गॅसेसमुळे पोट फुगल्यास किंवा पचनासंबंधी इतर तक्रारी असल्यास दोन मोठे चमचे जायफळाची पूड आणि पाव चमचा सुंठ पूड एकत्र करावे. भोजन करण्याच्या अर्धा तास आधी या मिर्शणातील १/८ चमचा पावडर गरम पाण्यासोबत सेवन करावी. तसेच ज्यांना अपचनाचा त्रास वारंवार होत असेल त्यांनी एक कप उकळत्या पाण्यामध्ये तीन वेलदोडे, पाव चमचा सुंठ पूड आणि एक चिमुटभर जायफळाची पूड घालून हे मिर्शण चांगले उकळावे आणि या काढय़ाचे सेवन करावे.
जर जुलाबाचा त्रास होत असेल, तर एक चमचा खसखस, दोन चमचे साखर, अर्धा चमचा वेलदोड्याचे दाणे आणि अध्र्या जायफळाची पूड मिक्सरवर एकत्र वाटून घ्यावी. दर दोन तासांनी या मिर्शणापैकी एक चमचा मिर्शण घेतल्याने जुलाब बंद होतात. लहान मुलांना जुलाब होत असल्यास दुधामध्ये थोडेसे जायफळ उगाळून घेऊन याचे चाटण दिल्याने जुलाब कमी होतात. तसेच जर पित्तामुळे किंवा अपचनामुळे मळमळत असले, तर एक चमचा मधात टीन ते चार थेंब जायफळाचे तेल घालून याचे सेवन केल्याले आराम पडतो.
हवामान बदलल्यामुळे झालेल्या सर्दी-खोकल्यावर उपचार म्हणून एक कप गरम पाण्यामध्ये पाव चमचा जायफळ पावडर घालून याचे सेवन केल्यास गुण येतो. तसेच पाव चमचा जायफळ पूड चहामध्ये घालून प्यायल्यासही सर्दी-खोकल्यामध्ये चांगला गुण येतो. मात्र जायफळ प्रकृतीने उष्ण असल्याने ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता अधिक असते, त्यांनी जायफळाचे सेवन कमी प्रमाणात करावे. जायफळाच्या अतिसेवनाने सुस्ती, क्वचित गुंगीही येते. तसेच याच्या अतिसेवनाने मळमळणे, दम लागणे, अशा समस्या ही उद्भवू शकण्याचा धोका संभवत असल्याने याचे सेवन र्मयादित प्रमाणात केले जाणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment